आत्महत्येसाठी ६० फूट खोल खदानीत महिलेने घेतली उडी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:26+5:302021-02-07T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खोटेनगर परिसरातील तालुका पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खदाणीत जयश्री रवींद्र पाटील (४५, रा. सुदत्त कॉलनी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव :
खोटेनगर परिसरातील तालुका पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खदाणीत जयश्री रवींद्र पाटील (४५, रा. सुदत्त कॉलनी, आव्हाणे रोड) या महिलेने शनिवार सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, खदानीच्या टोकावरून ती महिला पाणथळीवर पडल्याने बालंबाल बचावली असून जखमी झाली आहे. दरम्यान, अडीच तासांनंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांसह पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून महिलेचे प्राण वाचविले.
सुदत्त कॉलनीतील जयश्री रवींद्र पाटील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता त्या तालुका पोलीस स्टेशनजवळील ६० फूट खोल खदानीजवळ आल्या़ काही क्षणार्धात त्यांनी खदानीत उडी घेतली़ खदानीत पाणी साचलेले असून त्यावर पानथळ उगवलेली आहेत. त्या काठाजवळील पाणथळीवर पडल्याने थोडक्यात बचावल्या. पण, त्यांना जबर मार लागला.
महिलेला वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाने घेतली धाव
महिलेने खदानीत उडी घेतल्याचा प्रकार जवळच असलेल्या रामराव खिमा पवार या सुरक्षा रक्षकाला दिसला. त्याने लागलीच खदानीकडे धाव घेतली. खदानीत उतरून या महिलेला पाण्यातून बाहेर काढून काठावर बसविले. दरम्यान, एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळताच, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, अनिल फेगडे, बापू कोळी, धर्मेंद्र ठाकूर, भूषण सपकाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत महिलेला खदानीतून वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन विभागाच्या मदतीने काढले बाहेर
खदानीतून वर चढणे शक्य नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून बोलवून घेतले. त्यानंतर परिसरात रंगकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी रंगकामासाठी वापरली जाणारी शिडी मागविली. तोपर्यंत अग्निशमन विभागाचे अश्वजित घोरपडे, भारत बारी, तेजस जोशी, अनिल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर शिडीच्या साहाय्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांमधील एक कर्मचारी खाली उतरला. सुरुवातीला महिलेला पिण्यास पाणी दिले. नंतर तिला शिडीच्या साहाय्याने खदानीतून बाहेर काढले. पोलिसांनी लागलीच जयश्री पाटील यांना विचारपूस करत माहिती जाणून घेत माहिती. घटनास्थळी पोहोचलेली बहीण मीनाक्षी व भाचा योगेश बाळू पाटील यांच्या स्वाधीन त्यांना करण्यात आले.
अडीच तासांपासून बचाव कार्य होते सुरू
सकाळी साडेसात वाजेपासून सुरू असलेले बचाव कार्य तब्बल अडीच तासांनंतर १० वाजेच्या सुमारास संपले. घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. याठिकाणी यापूर्वीही अनेक घटना घडलेल्या असल्याने ही खदान लवकरात लवकर बुजविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून झाली. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ती महिला मानसिक रुग्ण
दरम्यान, महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत नेमके कारण कळू शकलेले नाही. मात्र, पाटील या मानसिक रुग्ण असल्याने तिने हा प्रकार केल्याचे नातेवाइकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. दरम्यान, जीवाची कुठलीही पर्वा न करता प्रसंगावधान दाखवत महिलेला वाचविण्यासाठी खदानीत उतरलेल्या रामराव पवार या सुरक्षारक्षकाचे ही परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.