चोरटे घरात धुमाकूळ घालत असताना जीव वाचविण्यासाठी महिला रात्रभर अंथरुणातच राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:33+5:302021-02-15T04:14:33+5:30
जळगाव : खेडी शिवारात एकाच ठिकाणी दरोडा तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. त्याआधी तीनही ठिकाणी चोरी करण्यापूर्वी दीड ...
जळगाव : खेडी शिवारात एकाच ठिकाणी दरोडा तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. त्याआधी तीनही ठिकाणी चोरी करण्यापूर्वी दीड वाजता महामार्गाला लागून असलेल्या यमुना नगरात विजय सुखदेव चव्हाण यांच्या घरातही चोरट्यांनी शिरकाव केला. मागील दरवाजा कडीने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात चोरटे आल्याची खात्री पटल्यावर वैशाली यांचा थरकाप उडाला. रात्रभर तशाच अंथरुणात राहिल्या. हा अनुभव त्यांनी ‘लोकमत’जवळ कथन केला.
यमुना नगर हे दूरदर्शन टॉवरच्या अलीकडे आहे. या भागात मोजकेच घरे असून शेत शिवार तसेच शुकशुकाट असतो. रात्री गल्ल्यांमध्ये लाईटसुध्दा नाही. विजय चव्हाण हे मिस्तरी काम व वाहन चालक म्हणून करतात, रात्री ते कामावर असल्याने घरात पत्नी व मुलगी असे दोघंच होते. रात्री दीड वाजता चोरट्यांच्या आवाजामुळे पुढच्या खोलीत झोपलेली पत्नी वैशाली व मुलगी ज्योती (१२) यांना जाग आली. घरी पती नसल्याने त्यात चोरटे घरात आल्याची खात्री पटल्यावर वैशाली यांचा थरकाप उडाला. त्यांनी आणखी चादर पांघरूण घेत मुलीला जवळ घेतले. रात्रभर तशाच पडून राहिल्या. पहाटे सातवाजेपर्यंत वैशाली या अंथरुणाच्या बाहेर निघाल्या नाहीत. सकाळी या खोलीत आल्या असता साहित्याची नासधूस झालेली होती. घरातील सुटकेस बाहेर शंभर मीटर अंतरावर आढळून आली. त्यातील एक हजार रुपये रोख व काही साड्या घेऊन गेले. काही साड्या सुटकेसमध्ये जशाच्या तशा होत्या. पंधरा दिवसांपूर्वी चव्हाण दाम्पत्य या घरात भाड्याने रहायला आले होते. या घटनेने महिला प्रचंड हादरली असून या परिसरात आता रहायचंच नाही, असा निर्णय त्यांनी घेतला.