महिला पोलिसाला ओळखपत्र मागताच गुन्हा दाखल करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:05+5:302021-05-20T04:17:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८१ जणांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. ...

The woman threatened to file a case if she asked the police for an identity card | महिला पोलिसाला ओळखपत्र मागताच गुन्हा दाखल करण्याची धमकी

महिला पोलिसाला ओळखपत्र मागताच गुन्हा दाखल करण्याची धमकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८१ जणांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मनपा कर्मचाऱ्याने ओळखपत्र मागितल्यावरून वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या महिला पोलिसाने थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. शहरातील टॉवर चौकात मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने बुधवारी विनाकारण फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करीत प्रत्येकी २०० रुपयांचा दंड देखील वसूल केला.

विनाकारण फिरणाऱ्यांकडून दिली जातात अजब उत्तरे

संचारबंदी असल्याने शहरात विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. असे करणाऱ्यांवर मनपाकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, विनाकारण फिरणारे जेव्हा मनपा किंवा पोलिसांच्या पथकासमोर सापडतात, तेव्हा अनेकांकडून कारवाई करण्यात यावी यासाठी मजेशीर उत्तरे दिली जात असल्याचेही समोर आले आहे. अनेकजण रुग्णालयाचे कारण देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण किराणा आणण्याचे कारण देत आहेत. तसेच अनेक जण पथक समोर दिसताच रस्ता बदलून गल्ली-बोळातून मार्ग करताना दिसून येतात.

ज्वेलरी शॉपसह ११ दुकाने सील

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी शहरातील मुख्य बाजारपेठ भागात अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान सराफ बाजार परिसरातील काही दुकाने उघडी असल्याचे लक्षात आले. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने उघडण्यास बंदी असतानादेखील ही दुकाने सुरू असल्याने ज्वेलरीची दोन्ही दुकाने सील करण्यात आली. तसेच बळीराम पेठ, सुभाष चौक, नवी पेठ व फुले मार्केट परिसरातील कपड्यांची दुकाने देखील सील करण्यात आली आहेत.

महिला पोलीस कॉन्स्टेबल व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद

टॉवर चौक परिसरात मनपा पथकाकडून कारवाई सुरू असताना एक महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणाहून जात असताना, मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला विनाकारण फिरण्याचे कारण विचारले. त्यावर या महिलेने महिला कर्मचाऱ्यांना, आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला आपले ओळखपत्र दाखवण्याची विनंती केली. मात्र यावरून संबंधित महिला व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये काही शाब्दिक वाद झाले. याबाबत संबंधित महिलेने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. मात्र पोलीस व मनपा अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शांत करण्यात आला.

पिंप्राळा बाजारही उठवला

बुधवारी शहरातील पिंप्राळा भागात भरणाऱ्या आठवडा बाजारादरम्यान दुपारी ४ वाजेनंतर या ठिकाणी काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटायला सुरुवात केली होती. मात्र बाजार भरण्याअगोदरपासूनच या ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. यामुळे या भागात एकाही भाजीपाला विक्रेत्याला व्यवसाय करू दिला नाही. काही विक्रेत्यांनी गल्ली-बोळात जाऊन भाजीपाल्याची विक्री केल्याचे आढळून आले. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या ठिकाणी पंधरा भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

Web Title: The woman threatened to file a case if she asked the police for an identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.