त्या महिलेला जंतुसंसर्ग आणि रक्तही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:53+5:302021-08-14T04:20:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शरीरात रक्त कमी असलेल्या मीना बारेला या ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा बुधवारी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शरीरात रक्त कमी असलेल्या मीना बारेला या ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, या महिलेच्या शरीरात आधीच रक्त कमी होते व या महिलेला जंतुसंसर्ग झाला होता, असे प्राथमिक मृत्यूचे कारण हे शवविच्छेदनात समोर आले आहे. ही महिला जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी होती. त्यामुळे जळगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा करतेय काय, असा प्रश्न यातून समोर आला आहे.
कुपोषणाने बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या भागात कुठल्याच उपाययोजना पोहोचत नसल्याचे समोर आले होते. चोपडा तालुक्यातील एका कुपोषित बालकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्यांनाही कसल्याच उपायोजना पोहोचल्या नसल्याचे समोर आले होते. आता जनजागृतीचा अभाव आणि पुरेसे पोषण न मिळाल्याने जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे शेतात वास्तव्यास असणाऱ्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने तालुक्यात प्रशासनाच्या उपाययोजना सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर येत आहे. महिलेला जंतुसंसर्ग झालेला होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
महिला-बालविकासकडून माहिती घेण्याचे काम सुरू
महिला व बालविकास अधिकारी म्हणून देवेंद्र राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार घेतला असून, त्यांनी कुपोषणाच्या बाबतीत विविध बैठका घेऊन आढावा घेतला आहे. या महिलेबाबतही सविस्तर माहिती घेतली जात असून, स्थानिक पातळीवर योग्य उपाययोजनांबाबत सक्त सूचना देण्यात आल्याचे देवेंद्र राऊत यांनी सांगितले.