महिलेला सर्पदंश झाल्यानंतर सर्प आणला थेट रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:33+5:302021-07-19T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाघोदा (ता. रावेर) येथे शेतात काम करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाल्याने या महिलेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाघोदा (ता. रावेर) येथे शेतात काम करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाल्याने या महिलेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. नातेवाईकांनी हा सर्प मारून पिशवीतून सोबत थेट रुग्णालयात डॉक्टरांना दाखवायला आणला होता. या महिलेवर प्राथमिक उपचार करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी शहरातील आणखी एका महिलेलाही सर्पदंश झाल्याची घटना घडली.
वाघोदा येथील रहिवासी पूजा सुरेश लुल्हे (वय २५) या रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला. सर्प दिसल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला मारले. या महिलेवर सावदा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे उपचार करण्यात आले. दरम्यान, उपचारासाठी सोयीचे व्हावे, म्हणून या नातेवाईकांनी हा मृत साप पिशवीत टाकून थेट रुग्णालयात आणला होता. मात्र, त्याला बाहेर काढायला कोणीच धजावत नव्हते.
सलाईन पकडून रुग्ण महिला मार्गस्थ
या ठिकाणी प्राथमिक उपचार होतील, असे सांगून या महिलेला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, नातेवाईकांनी सलाईन लावलेल्या अवस्थेतच महिलेला त्या ठिकाणाहून बाहेर काढले. नंतर डॉक्टरांशी चर्चा करून सलाईन संपेपर्यंत ते रुग्णालयात थांबले.