दुकान उघडले, साफसफाई केली... घराकडे निघताना महिलेला क्रेनने चिरडले!
By सागर दुबे | Published: March 31, 2023 03:22 PM2023-03-31T15:22:21+5:302023-03-31T15:23:01+5:30
एमआयडीसी परिसरातील घटना ; चालक पोलिसांच्या ताब्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : नेहमीप्रमाणे सकाळी लाँड्रीचे दुकान उघडले. साफसफाई करून घराकडे पायी निघालेल्या रंजना उत्तम येसे (५३,रा. म्हाडा कॉलनी) या महिलेला मागून भरधाव आलेल्या क्रेनने चिरडल्याची घटना एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.
म्हाडा कॉलनी येथे रंजना येसे या मुलगा विकास आणि सून यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मुलगा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉंड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्यांनी लाँड्रीचे दुकान उघडले. त्यानंतर साफसफाई करून त्या घरी जाण्यासाठी पायी निघाल्या. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसजवळून जात असताना मागून भरधाव येणा-या क्रेनने (एमएच ४० पी २३०९) त्यांना जोरदार धडक दिली. त्या जमीनवर कोसळल्या आणि क्रेनचे पुढील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले...
घटनेनंतर नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेवून महिलेला वाहनातून जिल्हा रूग्णालयात हलविले. त्यानंतर क्रेन चालकाला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, रंजना येसे यांना जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. यावेळी कुटूंबियांसह नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटूबियांच्या ताब्यात देण्यात आला. मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परिवार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"