डांभुर्णी येथे शेतात काम करणाऱ्या तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 08:13 PM2018-06-17T20:13:53+5:302018-06-17T20:13:53+5:30
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात काम करीत असताना रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अनिता कोळी या १७ वर्षीय तरुणीला सर्पाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डांभुर्णी ता. रावेर, दि.१७ : शेतात काम करतांना सर्प दंश होऊन १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी येथे घडली.
डांभुर्णी येथील दादानगरमधील रहिवासी राजेंद्र कोळी यांची मुलगी अनिता कोळी (वय १७) ही पंडीत पाटील यांच्या शेतात कामासाठी गेली असता तिला रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सर्प दंश झाला. सदर घटना तिच्या लक्षात येताच विनोद कोळी, हरी कोळी, अण्णा कोळी यांनी तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांना दुपारी ४.३० वाजेला देण्यात आला. या घटनेमुळे डांभुर्णी गावात हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र कोळी यांना एकूण ५ मुली होत्या, त्या पैकी एक मुलगी काही दिवसांपूर्वी आजाराने मरण पावली असून दुसरी मुलगी सर्प दंशाने मरण पावली आहे. कोळी यांच्या सर्व मुली त्यांना दुग्धव्यवसायात मदत करतात.