पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:32+5:302021-03-22T04:14:32+5:30
गणेश कॉलनीतील घटना : टोळी जेरबंद होऊनही घटना सुरूच जळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्याने पायी ...
गणेश कॉलनीतील घटना : टोळी जेरबंद होऊनही घटना सुरूच
जळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्याने पायी जात असलेल्या सुनीता प्रकाश वाणी (४७, रा. नवी पेठ) या महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची २२ ग्रॅमची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी गणेश कॉलनीतील कृष्णासागर अपार्टमेंटजवळ घडली. या प्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता वाणी या शनिवारी सायंकाळी गणेश कॉलनीत पायी चालत असताना मागून दुचाकीवरून दोन जण आले. त्यातील एकाने त्यांना चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला तर मागे बसलेल्याने गळ्यातील सोनसाखळी तोडली. काही क्षणांतच दोघांनी तेथून धूम ठोकली. सुनीता वाणी यांनी आरडाओरड केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संशयित भरधाव वेगाने निघून गेले. एका जणाच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व खाकी पँट परिधान केलेली होती. चेहरा गव्हाळा व शरीराने सडपातळ होता तर दुसऱ्याचे वर्णन कळू शकले नाही. या घटनेनंतर वाणी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून घटना कथन केली. पोलिसांनी घटनास्थळ तसेच मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. वाणी यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात दोघांविरुद्ध रविवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १३९ ग्रॅमच्या सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या. तरीदेखील शहरात या घटना थांबलेल्या नाहीत. आणखी दुसरी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.