भुसावळात रस्ते दुरुस्तीसाठी महिला व जेष्ठ नागरिक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:42 PM2019-10-09T17:42:50+5:302019-10-09T17:48:08+5:30
पांडुरंगनाथ नगर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता तयार करून घेतला.
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील ग्रामीण भाग ओळखला जाणारा व नॅशनल हायवे क्रमांक सहा लागून असलेल्या खडका चौफुलीजवळच पांडुरंगनाथ नगर ते पूजा कॉम्प्लेक्स पर्यंत असलेला रोड एकूण पाचशे मीटर असून, या परिसरातील महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून हा रस्ता तयार करून घेतला.
पांडुरंगनाथ नगर ते पूजा कॉम्प्लेक्सपर्यंत असलेला मुख्य रस्त्यावरील खड्ड््यांच्या व चिखल गारयाला स्थानिक नागरिक कंटाळले होते. एकूण पाचशे मीटर पर्यंत असलेल्या रस्त्याची सतत पावसामुळे अतिशय दुरवस्था झाली होती. परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत आणि नगरसेवक नगरपालिका यांच्याकडे तक्रार देऊनसुद्धा अपयश आले. याच रस्त्याचे सुरुवातीला कामाचे फलक अनावरण व पूजा करण्यात आले होते. तरीसुद्धा कामाला सुरुवात न झाल्याने परिसरातील होत असलेल्या त्रास आणि संताप करावा लागतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी १०० घरातून प्रत्येकी दोनशे रुपये वर्गणी करून या मार्गावर खडी, मुरूम मागवून परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी श्रमदान करून मुरूम टाकून रस्त्याला चालना दिली. याकामी हेमा मुरलीधर माळी, श्रद्धा प्रदीप माळी, वैशाली सपकाळ, विद्या पाटील, रेखा पवार, अर्चना पाटील, राधिका लोहार, रूपाली लोहार व अनेक महिला तथा ज्येष्ठ नागरिक मधुकर सोनार, अनिल महाजन, संजय सापकर, सुपडू तायडे विनोद ठाकरे, संजय पाटील, नीलेश खांडणेकर, मोहन चौधरी, देवीदास मावळे, पीतांबर चौधरी, अनिल कांबळे, प्रवीण भावसार, प्रवीणसिंग पाटील, टी.के. पाटील आदींचा सहभाग होता.