आधुनिक जगतात महिला सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:29 PM2019-03-08T12:29:13+5:302019-03-08T12:29:19+5:30
- पल्लवी मयूर
आजच्या आधुनिक जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमीकरण होताना दिसत आहे. अर्थ क्षेत्रही याला अपवाद नाही. आज जगामध्ये अनेक आर्थिक संस्थांचे नेतृत्व करताना महिला अग्रणीय आहेत. तसेच आर्थिक क्षेत्राचा पाया असलेले शेती व लहान मोठे उद्योगधंदे यांच्या मध्येही महिला अग्रभागी दिसून येतात. नुकतेच गीता गोपीनाथ या आंतरराष्टÑीय मुद्रा कोष (आयएमएफ)च्या प्रमुख इकॉनोमिस्ट म्हणून निवड झाली. ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सीए, सीएस व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक पदवी व पदवीत्तर परीक्षा आहे ज्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन महिला आर्थिक क्षेत्रात जाऊ शकतात व आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात.
महिला जरी उच्च शिक्षण घेत आहेत, तरीही त्यांचा अर्थकारणामध्ये सहभाग हा फार कमी प्रमाणात आहे. भारतीय कुटुंबांमध्ये बहुतांश ठिकाणी स्त्री जरी अर्थाजन करत असली तरी त्याचे नियोजन पुरुषाच्या हाती असते. तसेच महिलांना कुटुंबातील आर्थिक नियोजनाबाबत (उदा. इन्शुरन्स, मेडिक्लेम, फिक्स डिपॉझीट) काहीच माहिती नसते. मग ज्यावेळी सर्व कुटुंबाचा भार स्त्रियांवर येतो तेव्हा मात्र महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्दैवाने महिला सुद्धा कौटुंबिक अर्थकारणामध्ये रस घेताना दिसून येत नाही. म्हणून आज महिला दिनी सांगावेसे वाटते की, त्यांनी कौटुंबिक तसेच आपल्याशी संबंधित असलेल्या सर्व घटकांमध्ये आर्थिक दृष्ट्या रस घ्यावा. एकीकडे अरुणधत्ती भट्टाचार्य, शिखा शर्मा, उषा सुब्रमण्यम अशा अनेक स्त्रिया ह्या आर्थिक आणि बँकींग क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर काम करत असताना दिसतात. दुसरीकडे या देशामध्ये वीस टक्केच्या आसपास महिला सी.ए. आहेत.
- पल्लवी मयूर, सीए, जळगाव