महिलांनी पालटवले लोण पिराचे गावाचे रुपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:48 AM2020-03-08T00:48:01+5:302020-03-08T00:49:24+5:30
लोण पिराच,े ता.भडगाव या ग्रामपंचायतीवर महिलाराज विराजमान झाले नि गावाचे रुपडंच बदलले.
प्रमोद ललवाणी ।
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : लोण पिराच,े ता.भडगाव या ग्रामपंचायतीवर महिलाराज विराजमान झाले नि गावाचे रुपडंच बदलले. यासाठी सरपंच चंदना विजय पाटील यांनी महिला सदस्यांना सोबत घेत स्मार्ट ग्राम करत तालुक्यातील स्मार्ट ग्रामचे पहिले १० लाखांचे बक्षीस मिळवत आदर्श, सुंदर, स्वच्छ गाव बनविण्यासाठी या महिलांची कामगिरी येथे उल्लेखनीय ठरली. स्मार्ट ग्राम पाठोपाठ इतरही बक्षीस या गावास मिळाली आहेत.
लोण पिराचे ग्रामपंचायतीवर सन २०१५ च्या निवडणुकीत प्रथमच महिलांच्या हाती सरपंच चंदना पाटील यांच्यासह इतर सहा महिलांनी हाती सत्ता घेताच गाव स्वच्छ, सुंदर व ग्रामपंचायत पेपरलेस करावी, पाणी प्रश्न सुरळीत करण्याबरोबरच ग्रामपंचायतीमार्फत नाममात्र शुल्कात आरओचे ग्रामस्थांना दिले पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवत त्यांनी गावाची सूत्रे हाती घेतली. गावात नवनवीन उपक्रम राबवित गाव सुंदर स्वच्छ बनविण्याचा संकल्पच केला नि प्रत्येक कामात हे महिलाराज यशस्वी झाले. ‘लोकमत’तर्फेदेखील वीज व्यवस्थापनात लोण ग्रामपंचायतीला तालुक्यातील प्रथम बक्षीस देण्यात आले. असे अनेकविध बक्षीस सन्मान या ग्रामपंचायत च्या महिलाराज ला मिळाले आहे
आता लक्ष स्मार्ट ग्रामच्या पहिल्या बक्षिसाकडे
चर्चेत असलेल्या लोण ग्रामपंचायतीचे लक्ष आता जिल्हास्तरीय दिले जाणारे स्मार्ट ग्रामकडे लागले आहे. येथेदेखील लोण ग्रामपंचायत निश्चित प्रथम येईल, असा विश्वास आहे.
विविध उपक्रमामुळे लोण ग्रामपंचायतीची चर्चा
या ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस, संपूर्ण गावात एलईडी दिवे, चार चौकात हाईमस्ट लॅम्प, शाळेची आकर्षक इमारत, टँकरमुक्त गाव, गावात दारूबंदी, वृक्ष लागवड, भूमीगत गटारी, सुसज्ज व्यायाम शाळा आदी उपक्रमामुळ असते.
ग्रामपंचायतमार्फत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क आरओचे पाणी दररोज दिले जाते .
मोहरम उत्सव
गावात एकही मुस्लीम कुटुंब नाही. येथे पिराचे ठाणे आहे. एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी मोहरम उत्सव साजरा करण्यात येत असतो. यात संपूर्ण गाव सहभागी होतो. अशा या महत्वपूर्ण असलेल्या गावाची सत्ता महिलांच्या हाती आहे.