जळगावात तालुक्यात बोरनार येथे भींत कोसळून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:43 PM2018-06-24T12:43:25+5:302018-06-24T12:44:53+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचार
जळगाव : पाऊस सुरू असताना जोरदार वीज कडाडल्याने घराची भींत कोसळून सुवर्णा लक्ष्मण कोळी (२६, रा. बोरनार, ता. जळगाव) ही महिला भींतीखाली दाबली जाऊन गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता बोरनार येथे घडली. या महिलेला शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून येथे उपचार सुरू आहेत.
घरी पाहुणे आले असल्याने भाजीसाठी सुवर्णा पाटील या घरातील भींतीजवळ मसाला बारीक करीत होत्या. अगोदरच पाऊस सुरू असताना जोरदार वीज कडाडल्याने मातीची भींत कोसळली व त्या खाली सदर महिला पूर्णपणे दाबली गेली. त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत महिलेला बाहेर काढले व तत्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविले. महिलेच्या पाय व पाठीला जबर मार लागला असून शनिवारी या महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
एक वर्षाचे बाळ सुखरुप
ही महिला स्वयंपाक करीत असताना महिलेची सासू आशाबाई कोळी यादेखील मदत करीत होत्या व बाजूलाच महिलेचा एक वर्षाचा मुलगाही होता. त्या वेळी आशाबाई कोळी या बाळाला घेऊन कामानिमित्त बाहेर पडल्या आणि काही क्षणातच घराची भींत कोसळली. त्यामुळे चिमुकल्या मुलाला कोणतीही इजा झाली नाही असे आशाबाई कोळी यांनी जिल्हा रुग्णालयात सांगितले.