जळगावातील शिवकॉलनीमधील महिलांचा पाण्यासाठी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:48 PM2019-04-09T12:48:23+5:302019-04-09T12:48:55+5:30
निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर
जळगाव : जळगाव शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहे. यात मंगळवारी शिवकॉलनी भागातील महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या देत सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली.
शहराच्या अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.
मोहननगर भागात कमी दाबाने व तोही उशिराने पाणीपुरवठा होत आहे. वरिष्ठांसह पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन करावे तर ते कायम स्वीचआॅफ असतात वा कव्हरेज क्षेत्राबाहेर असतात. चुकून फोन लागला तर पाणी सोडले आहे, १५-२० मिनिटात येईल, असे उत्तर दिले जाते, अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी केली आहे.
नशिराबाद ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ अधिकच बसत आहे. ग्रामपंचायतीला अखेर वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मागणी करावी लागत आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.
असोदा येथील पाणी टंचाईबाबत प्रशासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने महिन्यातून फक्त एका वेळेस पाणी येत आहे. आठ दिवसात पाणी टंचाई निवारणासाठी ठोस कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आहे.