रुग्णवाहिकेअभावी जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये ७ तास ताटकळली प्रसूत महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:01 PM2018-04-14T14:01:29+5:302018-04-14T14:01:29+5:30
१०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही मिळाली नाही रुग्णवाहिका
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने ही महिला व नवजात बालक सात तास जिल्हा रुग्णलायातच ताटकळून राहिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. १०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर खाजगी रुग्णवाहिका करून संध्याकाळी सहा वाजता या महिलेला घरी नेण्यात आले.
यावल तालुक्यातील किनगाव येथील एका २७ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालायात दाखल केले होते. या ठिकाणी महिलेची सिझेरियन होऊन प्रसूती झाली. त्यानंतर या महिलेला शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देऊन घरी पाठविण्यात येणार होते. तसे रुग्णालयाच्यावतीने महिलेला सांगण्यातही आले. मात्र घरी जाण्याची ओढ लागलेल्या या महिलेसह कुटुंबीयांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.
तासन् तास फिरवाफिरव अन् नातेवाईकांचीदमछाक
महिलेला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक असल्याने महिलेच्या नातेवाईकांनी १०२ क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी सकाळी ११ वाजता रुग्णवाहिका मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. नातेवाईकांनी पुन्हा संपर्क साधला असता १२ वाजता रुग्णवाहिका येईल, असे सांगण्यात आले. तरीदेखील दुपारपर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे चार ते पाच वेळा १०२ क्रमांकावर संपर्क साधून काहीच उपयोग न होता या कुटुंबास संध्याकाळपर्यंत केवळ प्रतीक्षाच करावी लागली. त्यामुळेप्रचंडमनस्तापझाला.
नातेवाईकांनी गाठले ‘लोकमत’ कार्यालय
वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने त्रस्त झालेले नातेवाईक शरद कोळी यांनी संध्याकाळी ‘लोकमत’चे कार्यालय गाठून आपबिती सांगितली व रुग्णांच्या होणाऱ्या हालबद्दल आरोग्य विभागावर संताप व्यक्त केला.
खाजगी रुग्णवाहिका करून पोहचले घरी
१०२ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका न आल्याने अखेर शरद कोळी यांनी खाजगी रुग्णवाहिका चालकाशी संपर्क साधून रुग्णवाहिका भाड्याने घेऊन महिलेला पिलखेडा येथे माहेरी नेण्यात आले. या यासाठी या कुटुंबास एक हजार मोजावे लागले.
शासकीय योजनांचा केवळ गवगवा करीत १०२ व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सदैव तत्पर राहत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात रुग्णांना असा प्रत्यय येत असेल तर या रुग्णवाहिकांचा काय उपयोग? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अनेकदा कटू अनुभव
यापूर्वीदेखील १०२ क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या क्रमांकावर फोनच घेतला जात नाही, असे अनुभव आल्याचेही या पूर्वी रुग्णांनी सांगितले आहे.
रुग्णवाहिका येथे उपलब्ध असतात. मात्र १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत कोणी आपल्याकडे आले नाही.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय