राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महिला खेळांडूची होणार निवड, जळगावात क्रिकेट स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 07:09 PM2023-09-14T19:09:33+5:302023-09-14T19:10:20+5:30
जळगाव येथे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत गुरुवारी पत्रकार परिषद झाली
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत सहभागी असून जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश असणार आहे अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे यांनी दिली.
जळगाव येथे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी ॲपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, निवड समितीमधील रेखा गोडबोले, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. स्पर्धेविषयी माहिती देताना बोबडे म्हणाले, की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना हा २० षटकांचा असेल व तो साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वाेत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक व मालिकावीर यांना पारितोषिके दिले जाईल. स्पर्धेचे उदघाटन दि. १५ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजता अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा यांच्यात तर दुपारी तामिळनाडू विरुद्ध पश्चिम बंगाल यांच्यात सामना होईल अशी माहिती दिली.