स्थलांतरीत मद्य दुकानाला महिलांनी लावली आग
By admin | Published: April 6, 2017 10:57 PM2017-04-06T22:57:44+5:302017-04-06T22:57:44+5:30
शहरातील शनवारा भागातील गुलमोहर ट्रेडर्स हे मद्य दुकान रहिवासी वस्तीतील राजीव नगरमध्ये गुरुवारी स्थलांतरीत झाल्यानंतर संतप्त महिलांनी दुकानाला आग लावत दुकानातील मद्य रस्त्यावर आणून फोडले.
ऑनलाइन लोकमत
बऱ्हाणपूर, दि. 06 - शहरातील शनवारा भागातील गुलमोहर ट्रेडर्स हे मद्य दुकान रहिवासी वस्तीतील राजीव नगरमध्ये गुरुवारी स्थलांतरीत झाल्यानंतर संतप्त महिलांनी दुकानाला आग लावत दुकानातील मद्य रस्त्यावर आणून फोडले.
दरम्यान, दुकानातील फ्रीज, साहित्यासह अन्य सामानही फोडण्यात आला.आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करीत पाईप फाडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनवारा भागातील मद्य दुकानाचे राजीव नगरमध्ये गुरुवारी स्थलांतर झाल्यानंतर महिलांनी त्यास तीव्र विरोध दर्शवत दुकानाला आग लावली शिवाय दुकानाती मद्य, फ्रीज व अन्य साहित्य रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला.
दुकानातील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला तेव्हा या बंबावरही दगडफेक करण्यात आली. आग विझवण्यासाठी असलेला पाईप चाकूद्वारे फाडण्यात आला. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोहोचल्यानंतर जमावाला पांगवण्यात आले. शहराचे मॅजिस्ट्रे सोहन कनास व शहर पोलीस अधीक्षक बीपीएस परीहार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)