महिलांनो आत्मशक्ती जागृत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 04:52 AM2016-10-03T04:52:29+5:302016-10-03T04:52:29+5:30
महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे.
जळगाव : महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे. महिलांनी आपल्यातील आत्मशक्ती जागृत करून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कृष्णमल जगन्नाथन यांनी महिला परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
जळगाव येथील जैनहिल्सवरील गांधीतीर्थ येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. गांधी रिसर्च फांउडेशनचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या झिल कार हरिस, पी. व्ही.राजगोपाल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलुभाऊ जैन, अनूभुती स्कूलच्या निशा जैन, मार्गारेट ट्युबलेट (स्वित्झर्लंड), आयडा गामुया (कोलंबो), सॅरिना (अमेरिका), आयरिल साडिईगो, सुमैय्या यांच्यासह देशविदेशातील सुमारे दोन हजार महिला परिषदेत सहभागी झाल्या आहेत.
गांधी रिसर्च फाउंडेशन, इंटरनॅशनल गांधीयन इन्स्टिट्यूट फॉर नॉन वायसन्स अॅण्ड पीस, एकता फाउंडेशन, भोपाळ यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. कृष्णमल जगन्नाथन म्हणाल्या, नारी शक्ती काय आहे. हे पश्चिम बंगामध्ये ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले. टाटा समुहाने नॅनो कारसाठी प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी तेथील महिलांनी सलग २६ दिवस आंदोलन सुरु ठेवत आपली जमीन मिळविली. या जगात अशक्य काहीच नाही. फक्त महिलांनी आपली आत्मशक्ती जागृती करावी.
प्रारंभी देशविदेशातील महिलांनी सोबत आणलेली माती व्यासपीठावरील भांड्यात टाकून ‘जल, जंगल व जमिनी’ वाचविण्याचा संकल्प करण्यात आला. ही सर्व माती कृष्णमल जगन्नाथन यांच्याकडे सोपविण्यात आली. (प्रतिनिधी)
५० महिलांचा सन्मान
महिलांच्या हक्कसाठी काम करणाऱ्या देशभरातील ५० महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रितूपर्णा मोहंती यांनी तर आभार लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मानले. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, इटली, केनिया, ब्राझिल, फिलीपीन्स, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जर्मनीसह, देशातील विविध राज्यांतून दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या आहेत.
जळगाव येथील जैन हिल्स येथे रविवारी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी देश-विदेशातून आलेल्या महिलांनी आपल्या देशातील माती एका भांड्यात टाकून जल व जमीन वाचविण्याचा संकल्प केला.