महिलांनी आत्मविश्वास आणि धडाडीने काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:22+5:302021-07-07T04:20:22+5:30
जळगाव : मागील पंधरा वर्षांत माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम ...
जळगाव : मागील पंधरा वर्षांत माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही, असे प्रतिपादन वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांनी केले.
मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या संघटनेतर्फे सोमवारी माध्यमे आणि महिला या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, विविध चॅनलमध्ये महिला पत्रकारांची संख्या वाढली, मात्र अजूनही ड्युटीच्या वेळा लक्षात घेता या क्षेत्रात महिलांना येणे अवघड वाटते. या क्षेत्रात कधी कधी २४-२४ तास फिल्डवर राहावे लागते. अलीकडच्या काळात पत्रकारितेत फार मोठे बदल झाले आहेत. विशेषतः प्रिंट मीडियासमोर डिजिटल मीडियाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा या काळामध्ये समाज माध्यमातून येणाऱ्या माहितीची शहानिशा करून कमी वेळामध्ये ती लोकांसमोर सादर करणे हे कौशल्य आपणाजवळ असायला हवे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना पारितोषिक जाहीर
यावेळी कार्यक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या मीनल पाटील (जळगाव) आणि रसिका शिंदे (सोलापूर) या दोन विद्यार्थिनींना ज्ञानदा कदम यांच्यातर्फे पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मीम’ संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे सचिव डॉ. विनोद निताळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी परिश्रम घेतले.