संकटकाळात महिलांना मिळणार तात्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:48 PM2020-01-01T12:48:26+5:302020-01-01T12:49:06+5:30

निर्भया व दामिनी पथकाची पुनर्रचना

Women will get immediate help in times of crisis | संकटकाळात महिलांना मिळणार तात्काळ मदत

संकटकाळात महिलांना मिळणार तात्काळ मदत

Next

सुनील पाटील 
जळगाव : गेल्या काही दिवसात देशभरात महिला व तरुणींसोबत घडत असलेल्या दुर्देवी घटनांच्या पार्श्वभूमीवर आता महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी नवीन वर्षापासून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तात्काळ मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यासह निर्भया व दामिनी पथकाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याशिवाय पोलीस दलातर्फे ‘बडी कॉप’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरु आहे. यासाठी नियंत्रण कक्षातून २४ तास सेवा दिली जाणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून हेल्पलाईन मोबाइल क्रमांक व जिल्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन / तात्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक व व्हाट्सअप क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव येथे कार्यान्वित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादे गैरकृत्य किंवा चुकीचे काम होत असेल तर अशावेळी लोकांनी मोबाईलमध्ये फोटो काढून तो नियंत्रण कक्षात पाठवायचा आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून महिला पोलिसांचे निर्भया पथक, दामिनी पथक तात्काळ धावून येईल. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.
शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून महिलांविरुध्द अत्याचाराचे गुन्हे घडतात. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही तरूणी व महिलांना छेडछाड, लंगटपणा आदी अनुभव येत असतात.
नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही होत असतात. अशा ठिकाणच्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक व दामिनी पथक धावून येईल.
शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान गस्त घालणार आहे. पोलिसांना विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाणार आहे.
पोलीस काका - पोलीस दीदी योजना
शाळा तसेच महाविद्यालयात घडणाºया विविध गुन्हेगारी घटनांवर ( रॅगिंग , अंमली पदार्थ सेव्हन , सायबर गुन्हे , मुलींची छेडखानी इत्यादी )वेळेवर नियंत्रण पोलीस व विद्यार्थी नाते तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ‘पोलीस काका,पोलीस दीदी’ योजना ही योजना राबविली जात आहे .
अधिकारी देतील शाळा, महाविद्यालयांना भेटी
प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे त्या त्या पोलीस ठाण्याचे अंतर्गत शाळा ,महाविद्यालय यांना दररोज भेट देऊन प्राचार्य, मुख्याध्यापक,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याशी सुरक्षिततेसाठी चर्चा करणार आहेत .
‘बडी कॉप’ ही संकल्पना
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.ज्या दुर्देवी घटनांमध्ये महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून विशेषत: वेगवेगळ्या कंपन्या, आयटी हब, जेथे महिला रात्री उशिरापर्यंत काम, नोकरी करतात अशा ठिकाणच्या महिलांना सुरक्षेचे भावना निर्माण करण्यासाठी ‘बडी कॉप’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर २४ तास ही सुविधा प्रदान केली जाणार आहे.
- डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव.

Web Title: Women will get immediate help in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव