निंभोरा येथे महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:50+5:302021-06-10T04:12:50+5:30
निंभोरा बुद्रूक, ता.रावेर : येथील कोळी वाड्यातील महिला एकवटल्या आहेत. अवैध दारू विक्री बंद करावी, असा एल्गार त्यांनी पुकारला ...
निंभोरा बुद्रूक, ता.रावेर : येथील कोळी वाड्यातील महिला एकवटल्या आहेत. अवैध दारू विक्री बंद करावी, असा एल्गार त्यांनी पुकारला आहे. याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून, अवैध दारू विक्री त्वरित थांबवावी, असे साकडे महिलांनी ग्रामपंचायतीला घातले.
या निवेदनात निंभोरा बुद्रूक गावातील कोळी वाडा भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. लहान-मोठे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे मृत्युदर वाढला आहे. १७ ते ३० या वयोगटातील तरुणांची व्यसनाधीन संख्या वाढत असून, लहान वयोगटातील मुलांनाही त्याचे व्यसन लागत आहे.
सात हजारांवर लोकसंख्या असलेल्या निंभोरा बुद्रूक गावात कोळी वाडा हा भाग सुमारे ३०० लोकवस्तीचा आहे. येथील काही घरांमध्ये अवैध दारू विक्री चालते. याचा फटका संपूर्ण गावाला बसतो.
कोळी वाड्यातील महिला व नागरिकांना या प्रकाराचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच सचिन महाले यांनी या विषयाकडे विशेष लक्ष देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करावी व आजच्या पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवावे, असे निवेदनात महिलांनी नमूद केले आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे महिलांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले.
महिलांनी घेतलेल्या या भूमिकेला मनसे तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चौधरी (जावळे) यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्वरित कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
मागे दीड महिन्यापूर्वी निंभोरा पोलिसांनी अवैध दारू व धंद्यांवर निंभोरासह परिसरात वॉशआऊट करून गुन्हे दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवरल्या होत्या. तशी कारवाई सातत्याने होणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
निंभोरासह परिसरातील अवैध दारू विक्री थांबवावी अन्यथा उपोषण करण्यात येईल. याला मनसेचा परिपूर्ण पाठिंबा राहील.
-स्वप्नील चौधरी (जावळे), तालुका उपाध्यक्ष, मनसे, रावेर
सरपंचांनी संपूर्ण गावात दारूबंदी करून युवकांना व्यसनाधीनतेपासून वाचवावे, अशी अपेक्षा आहे.
-महेंद्र संतोष कोळी, रहिवासी, कोळी वाडा, निंभोरा बुद्रूक, ता.रावेर