सोशल मीडियाच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींद्वारे महिलांचा व्यक्तीमत्त्व विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:50 PM2018-03-14T23:50:52+5:302018-03-14T23:50:52+5:30
वुमेनिया हॅपी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
विकास पाटील / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा व्यक्तीमत्त्व विकास व उद्योजकतेला वाव देण्याचे कार्य जळगावात सावित्रीच्या लेकींनी हाती घेतले आहे. जात, पात, धर्माचे कोणतेही बंधन न ठेवता फक्त महिलांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत ‘वुमेनिया हॅपी’ ग्रुपच्या माध्यामातून कार्य सुरु केले आहे. समाज माध्यमांचा कसा प्रभावी वापर होऊ शकतो, हे या ग्रुपने सिद्ध केले आहे.
ना अध्यक्ष ना सचिव...
कोणतेही मंडळ, संस्था म्हटले म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची कार्यकारिणी असतेच. कोणतेही कार्य करण्यासाठी पैसा लागतोच, त्यामुळे वर्गणीही गोळा केली जाते. जात, पात, धर्मानुसार या संस्था व मंडळ असतात. मात्र या सर्व बाबींना वुमेनिया हॅपी ग्रुप अपवाद आहे. कोणतीही कार्यकारिणी व अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड न करता महिलांचा विकास या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सुना आल्या एकत्र
महिलांना खूप काही करण्याची इच्छा असते. कुणाला घरात बसून व्यवसाय करायचा असतो तर कुणाला पाककृती, शेअर मार्केट अशा प्रकारे विविध प्रकारची माहिती आपल्या आवडीनुसार हवी असते. ती माहिती मिळावी यासाठी विवाहनंतर जळगावात सासरी आलेल्या काही सुना एकत्र आल्या. त्यांनी वुमेनिया हॅपी ग्रुप नावाचे फेसबुक तयार केले व त्याद्वारे महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये हे पेज तयार करण्यात आले. त्याद्वारे हवी ती माहिती महिलांना देण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही माहिती देण्यासाठी कोणतीही फी अथवा वर्गणी गोळा करण्यात येत नाही. सर्वकाहीमोफतआहे.
महिलांना मिळेत अवघ्या काही मिनिटात हवी ती माहिती
प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला मात्र व्हॉटस् अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इस्टाग्राम या समाज माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत महिलांना पुरेशी माहिती नसते, याबाबतही त्यांना माहिती मिळावी यासाठी तसेच योगा, शेअर मार्केट, पाककला कृती, आरोग्य, बँकींग, नेट बँकींग तसेच सौंदर्याबाबत तसेच मनोरंजनाची माहिती महिलांना दिली जात आहे. सोशल मीडियाचा कसा वापर करावा याबाबतही लवकरच कार्यशाळाही घेण्यात येणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फेसबुवरच महिलांसाठी स्पर्धा
फेसबुवकरच महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात व निकालही जाहीर करण्यात येतो. या उपक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात.
आठवडाभर दररोज एक कार्यक्रम
महिलांना हवी ती माहिती मिळावी तसेच मनोरंजनासाठी आठवडाभर दररोज एक कार्यक्रम घेतला जातो. सोमवारी महिलांना प्रोत्साहन, मंगळवारी पाक कला कृती, बुधवारी व शनिवारी मार्केट, गुरुवारी सौंदर्याबाबत, शुक्रवारी व्हॅकी फ्रायडे असतो, रविवारी मनोरंजन अशा प्रकारे आठवडाभर कार्यक्रम होत असतात. त्यात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे सी.ए. पूजा मुंदडा व तनीशा अडवाणी यांनी सांगितले.
व्यक्तीमत्त्व विकास व उद्योजकतेला वाव
महिलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी व उद्योजकतेला वाव मिळावा यासाठी सी.ए. पूजा मुंदडा, तनीशा अडवाणी, सुलेखा लुंकड, मीनल जैन, रश्मी एन. रेदासनी, मोना बिर्ला, कांचन मुंदडा, निकिता नितीन रेदासनी, रिझू रेदासनी या सावित्रीच्या लेकी मेहनत घेत आहेत. ग्रुपच्या कार्याबाबतची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.