रस्त्यासाठी महिलांचा ठिय्या; आमदारांना द्यावे लागले लेखी आश्वासन
By सुनील पाटील | Published: September 29, 2023 06:13 PM2023-09-29T18:13:42+5:302023-09-29T18:14:00+5:30
रामेश्वर कॉलनीतील प्रकार, एकाच रस्त्यासाठी दोन माजी नगरसेवकांचे पत्र
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: एकच रस्ता दोन माजी नगरसेवकांनी वेगवेगळ्या निधीतून घेतला आहे. निधीचा अपव्यव होऊ नये म्हणून कोणत्याही एकाच योजनेतून काम व्हावे या दोन नगरसेवकांच्या वादात रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त झालेल्या रामेश्वर कॉलनीतील महिलांनी शुक्रवारी स्वामी समर्थ चौकात ठिय्या मांडला होता. या प्रभागाच्या माजी नगरसेवकांसह आमदार सुरेश भोळे यांना घटनास्थळी जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. माजी नगरसेवक व आमदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रामेश्वर कॉलनीतील गट नं २५०, २५१ मध्ये भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील व शिंदे गटाचे आशुतोष पाटील यांनी रस्त्याचे काम टाकलेले आहे. एक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर दुसरा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आहे. एकाच रस्त्यासाठी दोघांनी प्रयत्न केलेले आहेत. आपलेच काम व्हावे यासाठी दोन्ही माजी नगरसेवकांकडून प्रयत्न केले जात आहे. आशुतोष पाटील पालकमंत्र्यांच्या गटाचे तर घुगे पाटील आमदारांच्या गटाचे आहेत. या दोघांच्या वादात रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप झाला.
शुक्रवारी सकाळी १० वाजता माजी नगरसेविका सुमित्रा सोनवणे,विजया मांडोळे, कल्पना ढाकणे, मिराबाई पाडळकर, रत्ना महाले, जया पाटील, भारती महाजन, संगीता पाटील, जयश्री चव्हाण, सुषमा काकडे, संदीप मांडोळे, गणेश पाटील, विशाल देशमुख, आशिष राजपूत, महेश माळी, हर्षल वाणी, नीलेश नारखेडे, आप्पा चौधरी, दीपक मांडोळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी स्वामी समर्थ चौकात ठिय्या मांडला होता.
मतदानावर बहिष्कार!
रामेश्वर कॉलनीतील समस्यांबाबत नागरिकांनी ‘रस्ते हरवले, आणि पाणी पेटले’ असे वर्णन केले. पाण्यासाठी केलेली अमृत योजना फेल झाली असून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे पूर्वीचीच पाण्याची लाईन सुरु करावी. पूर्वी चार इंच पाईप लाईनद्वारे एका टप्प्यात ५० घरांना पाणी मिळायचे. आता चार इंच लाईनवर ४०० घरांना पाणी दिले जाते,त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा मोटारी दोन दोन तास चालवून विज बिल वाढत आहे. नागरिक वेळेवर घर पट्टी, पाणी पट्टी भरतात, तरीही मनपा सुविधा का देत नाही. कर भरुन सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे.