सुख-दु:खाची ऊन-सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:14 PM2018-02-14T13:14:57+5:302018-02-14T13:15:02+5:30
संमिश्र प्रसंगांची मोठी रांग
१० एप्रिल १९०८ साल. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गुलाबला मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले रामी. आपल्याला नात झाल्याचा विशेष आनंद कस्तुरबाने साजरा केला. आपल्या नातलग बायकांच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पाडले. चारच दिवसांनंतर गोकूळदास या भाच्याचे निधन झाले. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो फिनिक्सला येणार होता. सारे संपले होते. कस्तुरबाला गोकूळदासच्या आठवणींनी बेजार केले. एकीकडे नातीच्या जन्माचा उत्सव तर दुसरीकडे भाच्याच्या निधनाचे दु:ख तिच्या वाटेला. अशा संमिश्र प्रसंगांची मोठी रांग सदा न् कदा असायची. एकीकडे उसळता आगडोंब असायचा तर दुसरीकडे झगमगता सण.
गांधीजी तुरुंगात होते. अल्बर्ट वेस्टने एका तारेने कस्तुरबाच्या तब्येतीबद्दल त्यांना कळवले होते. तिला रुग्णालयात हलवावे लागेल, असे त्याचे मत होते. यासाठी गांधीजींनीे लवकर तुरुंगातून सुटका करून घ्यावी. माघारी परतावे, असा त्याने सल्ला दिला. हे पत्र वाचून गांधीजींनी उत्तरादाखल ९ नोव्हेंबर १९०८ रोजी लिहिले-
‘प्रिय कस्तूर,
तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझे हृदय विदिर्ण झाले. तुझी सेवा करायला माझे मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारे काही अर्पण केलेले आहे. मी नाही तिकडे येऊ शकत. दंड भरल्यावर खरे तर मला तिथे येता येईल पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर. योग्य आणि नियमित आहार घे. तू बरी होशील आणि माझ्या दुर्दैवाने तू जर मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझे असे निघून जाणे काही वाईट नाही.
माझे तुजवर इतके प्रेम आहे की, तू निघून गेल्यावर माझ्यासाठी जिवंत राहशील. तुझा आत्मा तर अमर आहे. मी तुला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, तुला जावे लागले तर मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितले आहे की, तू ईश्वरावर आस्था ठेवून जीव सोडावास. तुझे बलिदान सत्याग्रहासाठी असेल. माझा लढा काही केवळ राजकीय स्वरूपाचा नाही. तो धार्मिक स्वरूपाचा आहे. यामुळे अतिशय स्वच्छ आहे. यात जीवन काय आणि मरण काय? दोघेही सारखे. तुही असे जाणे. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, अशी मी उमेद करतो, असे मागणे मागतो.’
- प्रा.डॉ. विश्वास पाटील