३०० मीटरच्या नाल्याचे काम तब्बल अडीच वर्षांतदेखील पूर्ण होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:21+5:302021-01-21T04:15:21+5:30
मनपाचा गलथान कारभार : तीन वेळा मुदतही संपली; वर्षभरात काय बदल करणार? लोकमत न्यूज नेटवर्क नाल्याचे ठिकाण - बजरंग ...
मनपाचा गलथान कारभार : तीन वेळा मुदतही संपली; वर्षभरात काय बदल करणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नाल्याचे ठिकाण - बजरंग बोगदा ते एसएमआयटी महाविद्यालय
लांबी - अंदाजीत ३०० मीटर
कामाला सुरुवात - १९ ऑगस्ट २०१९
कामाची मुदत - डिसेंबर २०१९
खर्च - ६१ लाख १७ हजार
सद्य:स्थिती - नाल्याचे बांधकाम अजूनही ५० टक्के अपूर्ण, झालेले बांधकामदेखील निकृष्ट
ठेकेदार - एन.डी.पाटील, शिवशक्ती कन्स्ट्रक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील एसएमआयटी कॉलेज रस्त्यावरील नेहरूनगरलगतच्या नाल्याचे केवळ ३०० मीटरचे बांधकाम तब्बल अडीच वर्षांतदेखील अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. या कामाची तीन वेळा मुदत संपली असून, अजूनही ५० टक्के कामदेखील पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वर्षभरात चेहरामोहरा बदलण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ३०० मीटरचे काम करतानाही ठेकेदारांना वठणीवर आणता येत नाही, तर दुसरीकडे प्रत्येक योजनेत चुकांचा कित्ता गिरविणाऱ्या मनपा प्रशासनालाही आता लहान-लहान कामेदेखील ठेकेदाराकडून करवून घेता येत नसल्याचेच दिसून येत आहे.
मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या भागातील नाला काही प्रमाणात सरकविण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. यासाठी आयुक्तांनी मुख्य रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण पाडले होते, तसेच नाल्याच्या कामासाठी विशेष निधीतून प्रस्ताव सादर केला होता. विधानसभा निवडणुकीआधी या नाल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. तत्कालीन महापौर सीमा भोळे, तत्कालीन आयुक्त उदय टेकाळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, अडीच वर्षांतदेखील हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
महापौर, उपमहापौरांनी अनेक वेळा बजावली नोटीस
या ठिकाणच्या संथ कामाबाबत ‘लोकमत’ने पावसाळ्यात मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापौर भारती सोनवणे व तत्कालीन उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनीदेखील ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी नोटीस बजावली होती, तसेच हे काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारादेखील देण्यात आला होता. मात्र, नोटीस देऊनही ठेकेदाराने हे काम सुरू केलेले नाही, तसेच मनपा प्रशासनानेदेखील ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारावर कुणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न पडला आहे.
एक लाथ मारली तरी बांधकाम कोसळेल - महापौर
या नाल्याचा बांधकामाची महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे असून, बांधण्यात आलेल्या भिंतीला एक लाथ मारली तरी हे बांधकाम कोसळेल, असेही महापौरांनी सांगितले, तसेच ठेकेदार एन.डी. पाटील व मनपाचे अभियंता प्रकाश पाटील यांना खडेबोल सुनावत, कामाच्या गुणवत्तेवरून अभियंता व ठेकेदारांना प्रामाणिकपणे काम करा, अन्यथा काळ्या यादीत टाकून कायमची बंदी घालू असाही इशारा महापौरांनी दिला. जर वर्ष-वर्ष लहानसे कामदेखील होत नसेल तर कामे घेण्यासाठी पुढे का येतात, असेही महापौरांनी सांगितले. हे काम चांगल्या दर्जाचे करून पूर्ण करण्याचा सूचना महापौरांनी दिल्या.
ठेकेदार मुजोर की मनपा प्रशासन अपयशी
शहरातील अनेक कामांमध्ये गुणवत्ता दिसून येत नाही, तसेच अनेक कामांना कार्यादेश देऊनदेखील ठेकेदार वेळेवर काम सुरू करताना दिसून येत नाही. त्यामुळे ठेकेदारांची मुजोरी वाढली की, मनपा प्रशासन या ठेकेदारांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना वठणीवर आणण्याची गरज आहे.
---