‘त्या’ पाच नगरसेवकांच्या अपात्रतेच्या अर्जावर आज कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:47+5:302021-06-23T04:11:47+5:30
मनपाचा ठरावावर आयुक्त देतील माहिती ? : प्रशांत नाईक यांनी दाखल केली आहे याचिका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...
मनपाचा ठरावावर आयुक्त देतील माहिती ? : प्रशांत नाईक यांनी दाखल केली आहे याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेतील घरकुल प्रकरणात दोषी ठरलेल्या मनपातील पाच विद्यमान नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल याचिकेवर बुधवारी जिल्हा न्यायालयात कामकाज होणार आहे. या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी गेल्या महिन्यात महासभेत देखील ठराव करण्यात आला असून, कामकाजादरम्यान मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी या ठरावाची माहिती न्यायालयात सादर करतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घरकुल प्रकरणात दोषी ठरलेल्या भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे, सदाशिव ढेकळे व दत्तात्रय कोळी या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी जिल्हा न्यायालयात कामकाज होणार आहे. सध्या सर्व नगरसेवक जामिनावर असून मनपाच्या कामकाजात सक्रीय आहेत. या पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशेष म्हणजे पाच नगरसेवकांपैकी एक नगरसेवक दत्तात्रय कोळी हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात अपात्रतेसाठी दावा दाखल केला आहे. या याचिकेच्या भितीने अजून काही नगरसेवक सेनेत दाखल करून घेण्यासाठीही हालचाली आहेत. त्यासाठीच गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत या पाच नगरसेवकांना अपात्र करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ठराव देखील मंजूर करून घेतला. दीड वर्षांपूर्वी ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी कोरोनामुळे कामकाज झाले नव्हते.
भाजपच्याही हालचाली सुरु
एकीकडे शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक अपात्र करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना, दुसरीकडे भाजपने देखील महापौर-उपमहौरपदाच्या निवडणुकीत बंडखोर झालेल्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी व नाशिक महापालिकेतील भाजपचे गटनेते देखील विभागीय आयुक्तांकडे चकरा मारत आहेत. याबाबत लवकरच नगरसेवकांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.