नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर पुढील महिन्यात होणार कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:46+5:302021-05-28T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत बंडखोरी करत भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला साथ देत, अवघ्या अडीच वर्षात महापालिकेत सत्तांतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत बंडखोरी करत भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला साथ देत, अवघ्या अडीच वर्षात महापालिकेत सत्तांतर घडवून आणणाऱ्या त्या २७ बंडखोर नगरसेवकांचा अपात्रतेच्या प्रस्तावावर नाशिक विभागीय आयुक्तांकडून पुढील महिन्यात सुनावणीच्या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वकिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रक्रियेला गती मिळणार असल्याची माहिती भाजपचा सूत्रांनी दिली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या आधीच भाजपच्या २७ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तसेच निवडणुकीत देखील शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवारांना जाहीर मतदान करत, भाजपची साथ सोडली होती. भाजपने सर्व बंडखोर नगरसेवकांविरोधात नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. तब्बल तीस हजार पानांचा प्रस्ताव भाजपने तयार केला होता. विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप कडून ॲड. सतीश भगत हे काम पाहत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना ची लागण झाल्यामुळे, या प्रस्तावावर कोणतेही कामकाज होऊ शकले नव्हते. मात्र, ॲड. भगत हे कोरोना वर मात करून परतले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वात पहिले सर्व २७ नगरसेवकांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर सुनावणी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
त्या ठरावावर महापौरांची झाली स्वाक्षरी
भाजपने एकीकडे २७ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवल्यानंतर, शिवसेनेने देखील १२ मे रोजी झालेल्या महासभेत घरकुल प्रकरणात शिक्षा झालेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेतला होता. या ठरावावर महापौर जयश्री महाजन यांनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. मनपा आयुक्तांकडून हा ठराव पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून सुरु असलेल्या अपात्रतेच्या प्रक्रियेला शिवसेनेने देखील उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.