प्रभाग क्रमांक दोनमधील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:44+5:302021-04-22T04:16:44+5:30
जळगाव - प्रभाग क्रमांक दोनमधील जिनिंग प्रेसजवळील रस्त्याच्या दुरुस्तीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही समस्या ...
जळगाव - प्रभाग क्रमांक दोनमधील जिनिंग प्रेसजवळील रस्त्याच्या दुरुस्तीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही समस्या कायम होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा
जळगाव - गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिक प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच बुधवारी वातावरणात बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तापमानात दोन अंशांची घट होऊन पारा ३९ अंशांवर खाली सरकला होता. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान येत्या काही दिवसात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गिरणा नदीपात्रातून जेसीबीद्वारे वाळू उपसा
जळगाव - तालुक्यातील आव्हाने, खेडी, निमखेडी, भोकरी या गावातील गिरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेस जेसीबीद्वारे बेसुमार वाळूचा उपसा केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दिवसा महसूल व पोलीस प्रशासनाच्या भीतीने नदीपात्रात शुकशुकाट पाहायला मिळत असला तरी रात्रीच्या वेळेस थेट नदीपात्रात जाऊन जेसीबीद्वारे शेकडो डंपर व ट्रॅक्टरमध्ये अनधिकृतपणे वाळूचा उपसा केला जात आहे. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने या भागातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आव्हाने व आव्हाणी येथील यात्रा उत्सव रद्द
जळगाव - तालुक्यातील आव्हाने व धरणगाव तालुक्यातील आव्हानी येथे दरवर्षी मरीआईच्या यात्रा उत्सव आयोजित केला जात असतो. मात्र यावर्षी जिल्हाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रोत्सव आयोजन समितीने यंदाच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रोत्सवाची दीडशे वर्षाची परंपरा असून, या ठिकाणी बारागाड्या देखील दरवर्षी ओढल्या जातात. मात्र या वर्षी प्रतीकात्मक स्वरूपात मरीआईची पूजा करून यात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे.