ममुराबादला वित्त आयोगाची कामे ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:22+5:302021-02-10T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून निवडणुकीपूर्वी सुरू केलेली विकासकामे गेल्या काही दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून निवडणुकीपूर्वी सुरू केलेली विकासकामे गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहेत. रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी, तसेच वाळू विखुरल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वित्त आयोगाचे काम का बंद पडले त्याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.
१४ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी तत्कालीन पदाधिकाऱ्यांमधील बेबनावामुळे मुदतीत खर्च होऊ शकला नव्हता. मात्र, ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतरच्या १५ दिवसांच्या काळात रखडलेल्या विकासकामांची पूर्तता करण्यासाठी काही जणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न झाले. त्यासाठी आवश्यक मानली जाणारी ई-टेंडरिंगची सर्व प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधितांना रीतसर कार्यादेशही देण्यात आले. त्यानंतर बसस्थानक परिसरात व अन्य एका ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरणसुद्धा हाती घेण्यात आले. त्यासाठी लागणारी खडी, वाळू व सिमेंट मागवून ठेवले गेले. बसस्थानक परिसरातील रामगंगा नगराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणही सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यादरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली आणि सुरू असलेल्या कामांना अचानक ब्रेक लागला.
सध्या रस्त्यालगत पडलेले खडी व वाळूचे ढीग ठिकठिकाणी अडचणीचे ठरू लागले आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्याबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त होत आहे.
--------------------
फोटो-
ममुराबाद येथे बसस्थानकालगत अपूर्णावस्थेतील रस्त्याची खडी अशी उखडली आहे. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. (छाया : जितेंद्र पाटील)