विद्यापीठात २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:50+5:302021-06-02T04:14:50+5:30
जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढविण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश ...
जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढविण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तीन ते चार महिन्यांपासून कोरोना विषाणूने कहर केला. सद्य:स्थितीला पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, तर मृत्यूचे प्रमाणही हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोना संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे १ ते १५ जूनपर्यंत राज्य शासनाने विशेष निर्बंध जाहीर केले आहेत. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी साठ ते सत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते, तर पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आळीपाळीने कर्मचाऱ्यांना बोलवून विद्यापीठातील कामकाज सुरू होते. आता १५ जूनपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता २५ टक्के याप्रमाणे आळीपाळीने बोलवून कार्यालयीन कामकाज करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल, अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश केले आहे.
पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नका
अत्यावश्यक कामकाजाकरिता वरिष्ठांनी कार्यालयात बोलविल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये त्वरित उपस्थित राहणे अनिवार्य असेल, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय त्यांचे मुख्यालय सोडू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.