रावेर तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 07:27 PM2020-09-13T19:27:25+5:302020-09-13T19:29:30+5:30
गत आठ नऊ वर्षांपासून पायाउभारणी झालेले तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे.
किरण चौधरी
रावेर : खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप, राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदकांची पद तालिका पटकावणारे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचे ध्येय उराशी घेऊन प्रचंड जिद्द, चिकाटी, मेहनतीने गरूडझेप घेण्यासाठी रावेरच्या भूमीत कंबर कसत आहेत. गत दशकात क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण युवकांनी रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा डौलाने रोवला असला तरी, मात्र या आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेणाºया खेळाडूंना गत आठ नऊ वर्षांपासून पायाउभारणी झालेल्या तालुका क्रीडा संकुलावर केवळ राजकीय अनास्थेमुळे कळस चढू न शकल्याने हे क्रीडासंकूल त्यांच्याकरीता दिवास्वप्न ठरले आहे.
आमदार शिरीष चौधरी यांनी उडवली झोप
आमदार शिरीष चौधरी यांच्या सन २००९ ते २०१४ च्या पंचवार्षिकमध्ये हे क्रीडा संकुल मंजूर झाले. सत्तांतरानंतर त्यांची दुसरी पंचवार्षिक उजाडली तरी शेळ्यामेंढ्यांचे आश्रयस्थान ठरलेल्या अपूर्णावस्थेतील टेनिस कोर्ट व जिम्नॅशियम हॉलमध्येच दंड बैठका घालत होते. मात्र, क्रीडा दिनाच्या औचित्याने आमदार शिरीष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा क्रीडा विभागाची झोप उडवल्याने पुन्हा त्या कामाला आजपासून केवळ झाडलोट करून गती देण्याचे काम सुरू झाले आहे.
कामे अपूर्णच
रावेर शहरातील उटखेडा रोडवरील तालुका क्रीडा संकुल मंजूर होऊन ८ ते ९ वर्ष लोटली असली तरी, गत सहा सात वर्षांपासून सव्वा कोटी रुपये अनुदानापैकी ९५ लाख रुपये अनुदान खर्ची पडले. त्यात एक बॅडमिंटन हॉल, जिम्नॅशियम हॉल व त्याला संलग्न चेंजिग रूमचे बांधकाम होऊन या बांधकामाची आंतर व बाह्य फिनिशिंंग बाकी आहे. त्याखेरीज क्रीडांगणात धावपट्टी व खो-खोचे क्रीडांगण तयार केले असल्याचा व नाल्याकडून भरावाला संरक्षण भिंत तथा एका कॉंक्रीट गटार बांधकाम केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जे.व्ही.तायडे यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या तालुका क्रीडा संकुलात एक अंदाजे दोन ते अडीच हजार चौरस फूट आकाराच्या बॅडमिंटन हॉलचे बांधकाम होऊन त्यावर गोलाकार डोम टाकण्यात आला आहे. या बॅडमिंटन हॉलच्या भिंतींना आंतर व बाह्य बाजूने प्लॅस्टर फिनिशिंग व रंगकाम बाकी असून, त्यास संलग्न चेंजिग रूममध्ये काही मजूर कुटुंंब वास्तव्यास आहेत. या ओसाड भागातील जिम्नॅशियम हॉलमध्ये मेंढपाळांनी मेंढीपालन केल्याने मलमूत्र पडल्याचे दिसत असून स्वच्छतागृह अपूर्णावस्थेत आढळून आले आहे.
धावपट्टीचा मात्र कुठेही थांगपत्ता नाही
बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक हॉल व चेंजिग रूम बांधकाम अपूर्णावस्थेत करण्याखेरीज धावपट्टी (रनिंग ट्रॅक) वा खो खो क्रीडांगणाचा मात्र कुठेही थांगपत्ता आढळून येत नाही. केवळ बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक हॉल व चेंजिग रूम बांधकाम करण्यासह या क्रीडा संकुलाच्या आवारात असलेली छोटी टेकडी जमीनदोस्त करून तेच गौणखनिज खोलगट भागात पसरवण्यासाठी तथा एक कॉंक्रीट भिंत व गटार बांधकामावर ९५ लाखांना चुना लावण्यात आल्याची संतप्त भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.
खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप या राष्ट्रीयकृत वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आता कॉमनवेल्थ गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सुवर्ण यशाला स्पर्श करण्यासाठी व आमच्या खेळाला पुरक व्यायाम व सरावासाठी शासनाने तातडीने जिमखाना उभारण्याची गरज आहे.
-अभिषेक महाजन, वेटलिफ्टींग सुवर्णपदक विजेता, खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप, रावेर
माझी चीनमध्ये आयोजित केल्या जाणाºया वर्ल्ड कौम्बो तायक्वांडो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या चाचणीसाठी निवड झाली आहे. मात्र रावेरला तालुका क्रीडा संकुल नसल्याने स्वामी स्पोर्ट्स क्लबमध्ये व्यायाम व सराव करतो. मात्र, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय खेळासाठी आवश्यक असलेल्या पुरेसा सुविधा खाजगी जिमखान्यात उपलब्ध नसल्याची मोठी खंत आहे.
-गोविंदा चारण, तायक्वांडो सुवर्णपदक विजेता, रावेर