निधी खर्चाला मंजुरी न मिळाल्याने विद्युत खांब स्थलांतराचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:41+5:302021-05-16T04:15:41+5:30
शिवाजीनगर उड्डाणपूल : पंधरा दिवस उलटूनही शासनाकडून मंजुरी नाही जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब ...
शिवाजीनगर उड्डाणपूल : पंधरा दिवस उलटूनही शासनाकडून मंजुरी नाही
जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाने मंजूर केलेल्या निधीला, शासनाने परवानगी देण्याबाबत मनपाने १५ दिवसांपासून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्यापही या निधी खर्चाला शासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे विद्युत खांब स्थलांतराचे काम रखडले आहे. त्यामुळे शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या कामाला अधिकच विलंब होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरू असून, दोन वर्षांची मुदत संपल्यावरही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवाजी नगर वासीयांचे हाल सुरूच असून, त्यांना जीव धोक्यात घालून तहसील कार्यालयाकडून रेल्वे रूळ ओलांडून वापर करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी नगर उड्डाणपुलाचे आतील बहुतांश काम पूर्ण झाले असून, मक्तेदारातर्फे गेल्या महिन्यापासून जिल्हा परिषदेसमोरील कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी खुदाईचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, केळकर मार्केट समोरून पुलाला सुरुवात होणार असल्याने, या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबामुळे हे काम थांबले आहे. अडथळा ठरणारे हे विद्युत खांब काढल्यानंतरच, मक्तेदाराला पुलाच्या चढाईचे काम करता येणार आहे. त्यामुळे विद्युत खांब हटविणे गरजेचे असल्याचे बांधकाम विभागाने महावितरण प्रशासनाला कळविले आहे.
इन्फो :
निधीच्या खर्चाबाबत पंधरा दिवसांपासून शासनाकडे प्रस्ताव
मनपाने अडथळा ठरणारे विद्युत खांब काढणे व त्याच ठिकाणी नवीन विद्युत लाईन उभारण्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची परवानगी मिळण्याबाबत मनपा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, प्रस्ताव पाठवून पंधरा दिवस उलटूनही शासनातर्फे या निधी खर्चाला मंजुरी मिळालेली नाही.
इन्फो :
पुलाचे बाहेरील काम रखडले
सध्या शिवाजीनगर उड्डाण पुलाचे आतील काम वेगाने सुरू आहे. मात्र, बाहेरील काम विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे बंद आहे. विद्युत खांब हटविल्यानंतरच बाहेरील कामाला सुरुवात होणार असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, पंधरा दिवसांनी आता पावसाळा सुरू होणार असल्याने, अशा परिस्थितीत महावितरणला विद्युत काम करणे अवघड असते. त्यामुळे आता शासनातर्फे पुढे पावसाळ्याच्या तोंडावर जरी मंजुरी देण्यात आली, तरी महावितरणला पुढे हे काम करणे मोठे आवाहन निर्माण करणारे असणार आहे.
इन्फो :
मनपाने विद्युत खांब काढण्यासाठी मंजूर केलेल्या निधी खर्चाला परवानगी मिळण्याबाबत शासनाकडे परवानगी मागितली आहे. मात्र, शासनाकडून अजून परवानगी देण्यात आलेली नाही.
सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा