शिवाजीनगर उड्डाणपुलाचे विद्युत खांब काढण्याचे काम थंडबस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:41+5:302021-03-27T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत खांब काढण्याबाबतचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहत असल्याने या पुलाच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्युत खांब काढण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी अजूनही हे विद्युत खांब काढण्या बाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. विद्युत खांब काढण्याचे काम जोपर्यंत लांबत जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील लांबणार आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. मात्र मुदत संपल्यानंतर देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामासाठी या पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब काढणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून निधी नसल्याने हे खांब करण्यात न आल्याने हे काम रखडत जात आहे. महापालिका प्रशासनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधी मधून शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या निधीपैकी दीड कोटींच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत महापालिकेने ठराव देखील झाला आहे. मात्र अद्यापही या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने हे काम रखडत जात आहे. या कामाला लागणारा निधीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा देखील समावेश आहे. या समितीने देखील या कामासाठी मंजुरी दिली असली तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनपातील सत्तांतरासाठी विद्युत खांबांचे स्थलांतराचे कामही ठरले कारणीभुत
महापालिकेतील सत्तांतरामध्ये विद्युत खांब काढण्याचे काम देखील एक कारण असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. विद्युत खांब काढण्याचे काम हे महावितरणकडून करण्यात यावे यासाठी आमदार सुरेश भोळे आग्रही होते. तर हे काम मनपा कडूनच करण्यात यावे यासाठी भाजपचे ते नवग्रह मंडळातील नगरसेवक आग्रही होते. याच कारणावरून आमदार भोळे व काही नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. आता महापालिकेत सत्तांतर झाल्याने हे काम महापालिकेकडून होते की महावितरणकडून याकडे देखील लक्ष लागले आहे. मात्र अनेक वर्षांपासून जळगावकर या पुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यासाठी विद्युत खांबांचे स्थलांतर आवश्यक आहे. यामुळे हे काम महावितरण करो की महापालिका ? आधी हे काम होणे महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्य जळगावकरांना वाटते.