ममुराबादला गटारीतील गाळ काढण्याचे काम पुन्हा थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:00+5:302021-03-29T04:11:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या विषयी वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या विषयी वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने लगेच गाळ काढण्यास सुरूवात केली होती. मात्र, काही दिवसानंतर लगेच हे काम पुन्हा थांबल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नियमितपणे सफाई होत नसल्याने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान व मोठ्या गटारी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यासंदर्भात सचित्र वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गटारींमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते.
गावातील सर्व गटारींची संपूर्ण सफाई खाजगी ठेका देऊन केली जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक आर. आर. मनोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली होती. त्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतही विषय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने कोणताही ठेका अद्याप दिलेला नाही. उलट जेवढे काही रोजंदारी मजूर गटारीतील गाळ काढण्यासाठी कार्यरत होते त्यांचे काम थांबविण्यात आले. गटारींची समस्या कायम असून डासांचे प्रमाण वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
-----------
फोटो-
ममुराबाद येथे शिंदेवाड्याच्या परिसरात सफाईअभावी गटारी अशा तुंबल्या आहेत. (जितेंद्र पाटील)