शिव कॉलनी पुलाच्या कामाला वर्षभरानंतरही मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:57+5:302021-04-10T04:15:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आता ५० टक्केपेक्षा जास्त झाले आहे; मात्र यात सर्वात ...

Work on Shiv Colony bridge is not sanctioned even after a year | शिव कॉलनी पुलाच्या कामाला वर्षभरानंतरही मंजुरी नाही

शिव कॉलनी पुलाच्या कामाला वर्षभरानंतरही मंजुरी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आता ५० टक्केपेक्षा जास्त झाले आहे; मात्र यात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या शिव कॉलनी येथील उड्डाण पुलाच्या कामाला अद्यापही महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिलेली नाही. खोटे नगर ते कालंका माता मंदिर या रस्त्याचे काम हरयाणाच्या ठेकेदाराला देण्यात आले आहे. यात शिव कॉलनी येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाचा समावेश करण्यात आला नव्हता; मात्र नागरिकांच्या मागणीमुळे खासदार उन्मेश पाटील यांनी येथे उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याला जवळपास एक वर्ष झाले, तरीही मंजुरी मिळु शकलेली नाही.

खोटे नगर ते कालंका माता मंदिर चौक या रस्त्याच्या कामासाठी ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यात दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक येथे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले; मात्र त्यात शिव कॉलनी, पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज, सालार नगर यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी तातडीने उड्डाणपूल उभारणी करण्याची मागणी केली. त्यावर खासदार उन्मेश पाटील यांनी तातडीने संबंधित विभागांशी संपर्क साधत त्या स्थळांची पाहणीदेखील केली; मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी शिव कॉलनी येथे उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव जळगाव प्रकल्प संचालकांनी नागपूरला पाठ‌वला; मात्र अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.

चेंज ऑफ स्कोपमधून मिळणार निधी

या कामात काही बदल करायचे असतील तर त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण दहा टक्के निधी चेंज ऑफ स्कोप अंतर्गत वापरता येणार आहे. त्यामुळे या ६ कोटींच्या रकमेत अग्रवाल चौकातील लहान बोगदा, त्यापुढील काही कामे आणि शिव कॉलनी येथील उड्डाणपूल करण्याचे निश्चित करण्यात आले.

ब्लॅक स्पॉट असूनही पहिल्या टप्प्यात समावेश नाही.

शिव कॉलनी हा परिसर अपघातांच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. असे असतानाही तेथे कोणताही उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. आता पहिल्या टप्प्यातीलच पण चेंज ऑफ स्कोपच्या रकमेतून हा उड्डाणपूल तयार होणार आहे.

रेल्वे ओव्हर ब्रिजचाही समावेश नाही

महामार्ग चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याचे काम जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त झाले आहे. असे असले तरी या टप्प्यात पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिजचा समावेश करण्यात आलेला नाही. खोटे नगर ते कालंका माता मंदिर हा रस्ता संपूर्ण चौपदरी होईल; मात्र फक्त रेल्वेवरील पूलच दोन पदरी राहणार आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

कोट - खासदार उन्मेश पाटील यांनी शिव कॉलनीजवळ भुयारी मार्गासाठी शब्द दिला आहे. त्याची मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. तरी केंद्र शासनाने याची मंजुरी द्यावी, तसेच महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याला वेग मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - रवींद्र नेरपगार, सदस्य मनपा प्रभाग समिती चार.

Web Title: Work on Shiv Colony bridge is not sanctioned even after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.