‘महावितरण’मुळे अडले जळगावातील शिवाजीनगर पुलाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:43 PM2018-08-08T17:43:35+5:302018-08-08T17:47:35+5:30
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झालेली असली तरीही हे काम बांधकाम विभागाच्या हिश्शाच्या कामाच्या निविदेअभावी तसेच पुलावरील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या स्थलांतराअभावी रखडले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम मार्गी लागले असले तरीही महावितरणकडून विद्युत वाहिनीचे स्थलांतर झालेले नसल्याने पुलाचे काम सुरू होण्यात अडथळा कायम आहे.
जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झालेली असली तरीही हे काम बांधकाम विभागाच्या हिश्शाच्या कामाच्या निविदेअभावी तसेच पुलावरील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या स्थलांतराअभावी रखडले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम मार्गी लागले असले तरीही महावितरणकडून विद्युत वाहिनीचे स्थलांतर झालेले नसल्याने पुलाचे काम सुरू होण्यात अडथळा कायम आहे.
उड्डाणपुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वेच्या हिश्शाच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली असली तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदाप्रक्रिया मात्र आचारसंहितेत अडकली होती. रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम एकाचवेळी सुरू करावे लागणार असल्याने आता आचारसंहिता संपल्याने हे काम मार्गी लागणार आहे. त्यानुसार मनपाचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हिश्शाच्या कामाची म्हणजेच पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
रेल्वेकडून मात्र त्यांच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम करण्याची तयारी पूर्ण झाली असून मक्तेदारास कार्यादेशही देण्यात आले आहेत. आता जुना पूल पाडण्याचे काम सुरू करावयाचे आहे. त्याचीही तयारी झाली आहे. मात्र या पुलावरून महावितरणची ११ केव्ही विद्युत वाहिनी गेलेली असल्याने ती वाहिनी व पोल हटविल्याशिवाय पूल पाडता येत नसल्याने काम अडले आहे.