दगडी दरवाज्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:23+5:302021-06-19T04:12:23+5:30
अमळनेर : ऐतिहासिक दगडी दरवाज्याच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली असून पालिकेतर्फे सराफ बाजारात येण्या-जाण्यासाठी बुरुजाच्या बाजूने पायऱ्या करण्याच्या कामाला ...
अमळनेर : ऐतिहासिक दगडी दरवाज्याच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली असून पालिकेतर्फे सराफ बाजारात येण्या-जाण्यासाठी बुरुजाच्या बाजूने पायऱ्या करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामाला दिरंगाई झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध करून सराफ बाजारात काळे झेंडे लावले होते.
दगडी दरवाज्याचा बुरुज कोसळल्यानंतर पुरातत्त्व विभागाने १० वर्षाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नगरपालिकेला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अमन कन्स्ट्रक्शनचे मालक चेतन शहा याना कोरोनानंतर गंभीर आजाराने ग्रासल्याने ते रुग्णालयात उपचार घेत असल्याने कामाला विलंब होत होता.
पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी ठेकेदाराला तीन नोटिसा दिल्या आहेत. सराफ बाजारात जाणारा रस्ता दीड वर्षांपासून बंद असल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले होते. यासाठी १७ रोजी पंकज चौधरी, गोपी कासार, प्रवीण पाठक, मुकुंद विसपुते, राजेंद्र पोतदार, अक्षय अग्रवाल, पराग चौधरी, जयश्री दाभाडे यांनी पुनर्निर्माण समिती स्थापन करून आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, १८ रोजी ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. बुरुजाच्या पायाचे खोदकाम करण्यात येणार आहे. तर माजी आमदार साहेबराव पाटील व नगरध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पालिकेच्या अभियंत्यांना बुरुजाच्या बाजूला नागरिकांना सराफ बाजारात येण्या-जाण्यासाठी पायऱ्या बांधण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ग्राहक व व्यापारी यांची सोय होणार आहे. ठेकेदार पावसाळ्यात बुरुजाची माती वाहून जाऊ नये म्हणून ताडपत्री टाकून दरवाजा सुरक्षित करण्यात येणार आहे.