अग्रवाल चौकातील भुयारी मार्गाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:19+5:302021-04-16T04:15:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता वेग आला आहे. गुरुवारी सकाळपासूनच महामार्गावरील अग्रवाल चौकात भुयारी ...

Work on the subway at Agrawal Chowk started | अग्रवाल चौकातील भुयारी मार्गाचे काम सुरू

अग्रवाल चौकातील भुयारी मार्गाचे काम सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता वेग आला आहे. गुरुवारी सकाळपासूनच महामार्गावरील अग्रवाल चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी त्याची पाहणी केली. सकाळी या ठिकाणी भुयारी मार्गाच्या आखणीचे काम सुरू होते.

महामार्गावर दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यासोबतच नागरिकांच्या मागणीनुसार तसेच मु. जे. महाविद्यालय परिसरातून विद्यार्थ्यांना प्रवास करणे सुखकर व्हावे, म्हणून अग्रवाल चौकातदेखील महामार्ग ओलांडण्यासाठी एक भुयारी मार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी फार खर्च होणार नसल्याने हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यात झांबरे विद्यालयाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीपासून काही अंतरावर समांतर रस्ता आहे. तेथून पुढे बहिणाबाई उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हा भुयारी मार्ग असेल. त्यातून पायी, चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांनी वाहतूक करता येऊ शकेल. त्यामुळे या परिसरातून महामार्ग ओलांडणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कामाला गुरुवारी सुरूवात करण्यात आली.

प्रभात चौकातील उड्डाणपुलाच्या उताराच्या खालीच हा भुयारी मार्ग होणार आहे.

या परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच हा चौक कायम वर्दळीचा असतो. असे असतानाही पहिल्या टप्प्यात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, नंतर चेंज ऑफ स्कोपमधून उपलब्ध झालेल्या निधीतून रक्कम वापरून हा भुयारी मार्ग तयार केला जात आहे. त्याच्या कामाला आता सुरूवात झाली आहे.

Web Title: Work on the subway at Agrawal Chowk started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.