निवडणुका उंबरठ्यावर असल्याने कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:07 AM2018-09-02T01:07:13+5:302018-09-02T01:07:35+5:30
चाळीसगाव येथे राष्टÑवादीची बैठक : जयंत पाटील यांचे आवाहन
चाळीसगाव, जि.जळगाव : लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर असल्याने मरगळ झटकून कामाला लागा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचवून बुथ लेव्हल पर्यंत संघटन मजबुत करा. असा सल्लाही यावेळी दिला. शनिवारी सायंकाळी सात वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील दौ-यात माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधला.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय, एनपीए यावर सविस्तर भाष्य नोंदविले. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत राजीव देशमुख यांच्या विजयासाठी संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, गुलाबराव पाटील, अरुण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला अध्यक्ष कल्पना पाटील, प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प. सदस्य भूषण पाटील, अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, दिलीप रामराव चौधरी, आर.के. माळी, भोजराज पुन्शी, रामचंद्र जाधव, मंगेश पाटील, अजय पाटील, सोनाली साळुंखे, अॅड. प्रदीप आगोणे, प्रकाश सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदींच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी सडकून टिका केली. केंद्र सरकारचे निर्णय फसवे असून नोटबंदीमुळे देशात आर्थिक आरिष्टासह शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. असंघटीत कामगारांचा रोजगार गेल्याने उपासमारीचे 'बुरे दिन' त्यांच्या वाट्याला आले आहेत. राफेल विमान खरेदी संशयास्पद असून करार रद्द करुन सरकारनेच हे गूढ आणखी वाढविल्याची टिकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा देखील त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वाचला.