वरखेडीत राज्य मार्गाचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:42+5:302021-07-26T04:14:42+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : अखेर वरखेडी येथील राज्य मार्गावर पडलेले खड्डे तात्पुरते बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत ग्रामस्थ, ...
वरखेडी, ता. पाचोरा : अखेर वरखेडी येथील राज्य मार्गावर पडलेले खड्डे तात्पुरते बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
गावातील राज्य मार्ग-१९ ची लांबी पूरहानी दुरुस्ती अंतर्गत मंजूर असून हे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाचोरा अंतर्गत येते. पावसामुळे वरखेडी बसस्थानकापासून ते भोकरी रेल्वे फाटकापर्यंतच्या लांबीतील डांबरीकरणाची सुरुवात करणे शक्य नव्हते. परंतु वरखेडी-भोकरी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य हे आमदार किशोर पाटील यांच्याकडे येऊन हे काम चालू करण्यासाठी आग्रही होते. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून खूपच दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे एक दिव्य झाले होते.
आमदार किशोर पाटील यांनी सा. बां. उपविभाग पाचोराचे सहाय्यक अभियंता श्रेणी- १ ए. जी. शेलार, शाखा अभियंता डी. एम. पाटील, एस. ओ. काजवे यांना दिलेल्या सूचनेनुसार रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्याचे खड्डे हे तात्पुरता उपाय म्हणून खडी व मुरूम टाकून भरण्यात येत आहेत. पावसाळ्यात डांबरी रस्ते केल्याने त्यांचे आयुष्य खूपच कमी असते आणि काम निकृष्ट होण्याची शक्यता असते, असे सा. बां. विभाग,उपविभाग पाचोरातर्फे सांगण्यात आले.
250721\25jal_3_25072021_12.jpg
पावसाळा असल्याने वरखेडी येथील राज्य मार्गाची तात्पुरती डागडुजी केली जात आहे.