दिवाळीपर्यंत पूर्ण होतील शहरातील जलकुंभांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:44+5:302021-04-20T04:16:44+5:30
जळगाव : अमृत अंतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. या अंतर्गत ...
जळगाव : अमृत अंतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. या अंतर्गत होत असलेल्या शहरातील ७ जलकुंभाचे काम देखील आता वेगाने सुरू आहे. त्यात सुप्रीम कॉलनीतील समचे काम पूर्ण झाले असून जलवाहिन्या टाकण्याचे काम देखील या ठिकाणी पूर्ण झाले आहे. तर उर्वरित जलकुंभाचे काम देखील दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याचा विश्वास मनपा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
शिवाजी नगरातील जलकुंभाचे काम ९० टक्के पूर्ण
शिवाजीनगर भागातील गेंदालाल मिल परिसरात जलकुंभाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून जवळपास पंधरा लाख लीटर क्षमता असलेल्या या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील पाण्याचा प्रश्न नेहमीसाठी मार्गी लागणार आहे. या भागात याआधी देखील एक जलकुंभ तयार करण्यात आले होते. आता नव्याने तयार झालेला जलकुंभामुळे या भागाला लागत वाढलेल्या भागात देखील पाणीपुरवठा केला जाणार आहे.
निमखेडी येथील जलकुंभाचे काम ही अंतिम टप्प्यात
निमखेडी परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची टंचाई सातत्याने निर्माण होत होती. मात्र अमृत अंतर्गत या भागासाठी स्वतंत्र जलकुंभ मुक्ताईनगर भागात तयार करण्यात आले असून, या जलकुंभाचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुमारे १२ लाख लीटर या जलकुंभाची क्षमता आहे.
नित्यानंद नगर भागातील जलकुंभाचे काम मात्र संथ गतीने
नित्यानंद नगर भागात देखील जलकुंभाचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत योजना सुरू झाल्यानंतर सर्वात आधी या जलकुंभाच्या कामाला सुरुवात झाली होती मात्र अजूनही हे काम पूर्णत्वास आलेले नाही. या जलकुंभांचे आरसीसी डिझाईन तयार करण्यात आले आहे. सुरक्षा व गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून तयार झालेल्या डिझाईनची पडताळणी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञ अभियंत्यांकडून मान्यता मिळाली होती.