संमेलनातून घडेल भाषा साक्षात्काराचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:26 AM2019-03-25T11:26:28+5:302019-03-25T11:27:14+5:30

पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलन : मायबोलीतील साहित्यावर कवी-लेखकांनी केले मंथन

The work will be done through the seminar | संमेलनातून घडेल भाषा साक्षात्काराचे काम

संमेलनातून घडेल भाषा साक्षात्काराचे काम

Next
ठळक मुद्देचार ठराव संमेलनात पारीत


जळगाव : प्रत्येक समाजाची बोलीभाषा ही त्या समाजाची संस्कृती, इतिहास, परंपरा व व्यक्तीमत्वाचे दर्शन घडविते. या संमेलनाच्या माध्यमातून भाषा साक्षात्काराचे मोठे काम घडेल, असा सूर रविवारी येथे आयोजित पहिल्या लेवा गणबोली साहित्य संमेलनात उमटला. आपल्या मायबोलीचा न्युनगंड न बाळगता, तिचा अभिमान बाळगण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात एकदिवसीय लेवा गण बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी उद्घाटन समारंभात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. राम नेमाडे, विद्यापीठाचे कुलगुरु पी. पी. पाटील, साहित्यिक राजन गवस (कोल्हापूर), महापौर सीमा भोळे, निमंत्रक डॉ. नि. रा.पाटील, कवी समिक्षक डॉ. मनोहर जाधव, ज्येष्ठ साहित्यिका आशालता कांबळे, स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद नारखेडे, जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, नगरसेवक विष्णू भंगाळे, हैद्राबाद येथील गुगल सॉफ्ट इंजिनिअर अभियंता आशिष चौधरी, आयोजक तुषार वाघुळदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजन गवस यांनी सांगितले की, शिकलेल्या माणसांना भाषा साक्षात्कार करणे खूप गरजेचे आहे. कारण, गुरुजींनी वर्गांत शुद्ध भाषा बोलण्याचे सांगितल्यावर आपोआप बोली भाषेचा विसर पडायला लागतो. आज आपण पुण्याच्या भाषेला प्रमाणभाषा म्हणुन स्वीकारले आहे. कारण, कोकणी असो किंवा विदर्भातला असो, त्या प्रत्येकाला पुणेरी भाषा समजत असल्यामुळे, या प्रमाणभाषेला आपण स्वीकारले असल्याचे डॉ. गवस यांनी सांगितले.
शुद्धलेखन या एका शब्दाने बोली भाषेचा घात केला
गुरुजी शाळेमध्ये मुलांना शुद्धलेखन व्यवस्थित करा, शुद्ध बोला असे सांगतात. त्यामुळे जन्मापासून बोली भाषेत बोलणाऱ्या मुलांमध्ये न्युनगंड तयार होतो. यामुळे ते बोली भाषेचा वापर कमी करतात. शुद्धलेखन या एका शब्दाने बोली भाषेचा घात केला असल्याचे डॉ.गवस यांनी सांगितले.
विद्यापीठामध्ये बहिणाबाई साहित्य संशोधन केंद्राला मंजुरी
कुलुगुरु डॉ. पी. पी. पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आल्याने, याचा समाजाला मोठा अभिमान आहे. लेवा गणबोली ही अहिराणी भाषा असल्याचे समजले जात आहे, मात्र हा हा गैरसमज दूर करण्याचे काम साहित्यिकांना करावे लागणार आहे. विद्यापीठामध्ये बहिणाबाई साहित्य संशोधन केंद्रालाही नुकतीच मान्यता मिळाली आहे. यामुळे बहिणाबाईंच्या साहित्यावर अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
२०० वर्षापासून लेवा गणबोली
डॉ. राम नेमाडे यांनी सांगितले की, १५० ते २०० वर्षांपासून लेवा गणबोली भाषा बोलली जात असून, या भाषेमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी विविध कथा-कविता लिहुन या भाषेला अधिक समृद्ध बनविले आहे. त्यांच्यामुळे या भाषेला अधिक महत्व आले असून, त्यांनी या भाषेला जगाच्या पाठीवर नेले आहे. या मातेने समाजावर थोर उपकार केले असल्याचेही डॉ. नेमाडे यांनी सांगितले.
इग्रजी शिका मात्र बोलीभाषेवरही प्रेम करा
कवी डॉ. प्रा. मनोहर जाधव यांनी सांगितले की, प्रत्येकाला आपल्या बोलीभाषेचा अभिमान असला पाहिज तसेच दुसऱ्या भाषेला कमी लेखून, स्वत:ची भाषा श्रीमंत होत नाही. त्यामुळे गरज म्हणून इंग्रजी भाषा अवश्य शिका, मात्र, बोली भाषेवरही प्रेम करा.
ज्ञानाचा मार्ग हा बोलीभाषेतूनच
ज्येष्ठ साहित्यिका आशालता कांबळे यांनी सांगितले की, बोलीभाषा ही माणसाच्या समृद्धीचा मार्ग खुला करुन देत असते. ज्ञानाचा मार्ग हा बोलीभाषेतूनच जात असतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी बोलीभाषेतुन ज्या कविता लिहल्या, त्या कवितांमधुन त्यांनी जगासमोर मानवतेचं दर्शन घडविले आहे. त्यांच्या कविता या जीवनाचे तत्वज्ञान आाणि जीवनाला दिशा देणाºया आहेत. डॉ. अरविंद नारखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी बोलीभाषेतुन कविता लिहिल्याने बोलीभाषेचा जगभर प्रसार झाला आहे.
...तरच मराठी भाषा समृद्ध होईल- डॉ. रमेश सूर्यवंशी
मराठी भाषा ही साहित्यासाठी प्रमाण भाषा मानली जाते परंतु जो पर्यंत मराठी भाषा बोली अर्थात प्रादेशिक भाषांना आपल्या कवेत घेत नाही तो पर्यंत या भाषेचे प्रामाण्य टिकणे कठीण आहे. बोली भाषा मराठीत स्विकारल्याने मराठी भाषेची समृद्धी वाढणार आहे. यामुळे ही भाषा वाढेल आणि टिकेलही,असे प्रतिपादन डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी भाषेवर बोलताना केले. बहिणाबाई यांनी अहिराणी भाषेत दमदार साहित्य निर्माण केले आहे. परंतु त्यांना समजायचे असेलतर त्यांच्या काव्याचे सचित्र वर्णन करणे गरजेचे आहे. जातं, मोट आदी शब्द हे आजच्या पिढीला माहित नाही यामुळे याचे चित्रही ओळख करुन देण्यासाठी गरजेचे आहे. तसेच ºहस्व आणि दीर्घ याचा विचार साहित्यात झाला नाही तर अनेक लेखक लिहते होतील,असेही ते म्हणाले.
या वेळी अनेक लेखकांची पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली. अरविंद नारखेडे यांचे लेवा गणबोली, संध्या महाजन - काव्य संध्या, व. पु. होेले - विचार करीसन बोल रे भो, डॉ. राम नेमाडे - वारीचे अभंग व माझी लेवागण बोली, शामकांत पाटील- लेवा जगत,श्रीराम अत्तरदे - सावलीच्या उन्हात, काशिनाथ बºहाटे -बहिणाबाई चौधरी व्यक्तीत्व आणि कवित्व, श. मु. चौधरी - गावातील सीताबय, सुकलाल चौधरी- धनपावले पुर्नप्रकाशित, मुकुंद ढाके -भारतीय पेंशन निती, विनोद इंगळे- लेवा सारस्वत भूषण. ही पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या संमेलनात सकाळच्या सत्रातील सूत्रसंचालन तुषार वाघुळदे, प्रा. संध्या महाजन व प्रणिता झांबरे यांनी केले. तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले. तसेच दुपारच्या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. सध्या महाजन यांनी केले. तसेच सायंकाळचे मराठी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा तायडे यांनी केले. अनेक कविंनी सहभाग घेतला होता.
२२ प्रकारच्या आदिवासी भाषा
भाषा ही थोड्या थोड्या अंतरावर बदलत जाते. आदिवासी भाषा ही तब्बल २२ प्रकारची असून या भाषेचाही वेगळा गोडवा आहे,असे प्रतिपादन नंदुरबार येथील लेखिका डॉ. पुष्पा गावित यांनी केले. बहिणाबाई यांची मन वढाय वढाय ही कविता आमच्या आदिवासी भाषेत तयार केली आहे, असे सांगत त्यांनी ही कविता सादर केली.
बोली भाषा सशक्त झाली पाहिजे
स्वत: लेवा समाजाचे नसताना आपल्या चारही कादंबºया लेवा भाषेत लिहणारे मुक्ताईनगर येथील साहित्यिक अ. फ. भालेराव यांनी बोलीभाषा सशक्त झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बोली भाषा ही बहुजनांची भाषा असून या भाषेतून नुकतीच काही चित्रपटांची निर्मिती झाली, त्या चित्रपटांनी कोटींची उड्डाणे घेतली. अंतकरणातील भावना शुद्ध असल्या तर त्याला भाषेची अडचण नसते. यामुळे एखादीच भाषा चांगली व दुसरी अशुद्ध हे म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.
जामनेरी बोलीही स्वतंत्र
जामनेर तालुका हा विदर्भ, मराठवाड्यालाही लागून आहे. यामुळे लेवा, अहिराणी, वºहाडी व मराठवाडी अशा सर्व भाषांचा प्रभाव येथील बोली भाषेवर असला तरी येथील वेगळी अशी जामनेरी बोली भाषा आहे,असे प्रतिपादन रवींद्र पांढरे यांनी केले. या भाषेचे स्वतंत्र अस्तित्व असून काही जण या भाषेला तावडी भाषाही म्हणतात मात्र ते चुकीचे आहे. जामनेरी भाषेत आता साहित्य निर्मितीही होवू लागल्याचे पांढरे यावेळी म्हणाले. इंग्रजीत जसे डूनॉट ला डोन्ट शॉटफॉर्म वापरला जातो. तसाच या भाषेत मी गेलो होतो ला गेलतो तर आलो होतो ला आलतो हा शॉटफार्म शब्द आला आहे, असे सांगून या भाषेतील काही म्हणीही त्यांनी सादर केल्यात.

चार ठराव संमेलनात पारीत
1 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आल्याबद्दल आमदार एकनाथराव खडसे, कुलगुरु पी. पी. पाटील आणि महाराष्ट्र शासन यांचे अभिनंदन करण्यात यावे.
2 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिले जावे, यासाठी बहिणाबाई सोपानदेव साहित्य संमेलन सोळा वेळा स्वत:च्या हिंमतीवर घेतले. ते साहित्यिक कै. पी. सी. नारखेडे उर्फ कवी मालतीकांत यांचे मरणोत्तर अभिवादन करण्यात यावे.
3 साहित्य अकादमीने चुकीची माहिती असलेले बहिणाबाई चौधरी नावाचे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. त्यावर आक्षेप घेण्यात यावा व पुस्तक बाजारातून हटविण्याची मागणी करण्यात यावी.
4 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लेवा गणबोलीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा आणि भाषा तज्ञांची समिती नेमण्यात यावी.

Web Title: The work will be done through the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.