कामगार निघाला चोर, किरणा दुकानातील ६ लाख ९० हजारांचा माल चोरून विक्री
By सागर दुबे | Published: March 16, 2023 08:24 PM2023-03-16T20:24:46+5:302023-03-16T20:25:02+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामगाराविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : रामेश्वर कॉलनीतील व्यावसायिक नंदकिशोर भागवत शिंदे यांच्या मालकीच्या श्री समर्थकृपा किरणा दुकानामधून कामगारानेच ६ लाख ९० हजार ५३० रूपयांचा माल चोरून परस्पर विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामगाराविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनी येथे नंदकिशोर शिंदे हे वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या खाली श्री समर्थकृपा नावाचे किरणा दुकान आहे. चार वर्षापासून दुकानात विशाल शरद पाटील हा मुलगा कामाला आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिंदे हे दुकानात मालाचा हिशोर करीत होते. त्यावेळी त्यांना दुकानातील माल जास्त विक्री झालेला पण, मालाचे पैसे पूर्ण दिसले नाही. त्यांना संशय बळावल्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात विशाल याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. त्याला हिशोबा संदर्भात विचारपूस केल्यावर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. नंतर त्याच्या आई-वडीलांना बोलवून त्याला मालाबाबत विचारपूस केल्यानंतर त्याने दुकानातील माल चोरून बाहेर विकल्याची कबुली दिली.
मालाचा हिशोब केला अन् धक्काच बसला...
कामगाराने माल चोरून विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर शिंदे यांनी चोरीला गेलेल्या मालाचा हिशोब केला. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. कामगार विशाल याने तब्बल ६ लाख ९० हजार ५३० रूपयांचा माल दुकानातून चोरून विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी विशाल याने पैसे थोडे-थोड करून पूर्ण पैसे देईल, असे दुकान मालकाला सांगितले. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी १ लाख २१ हजार रूपये त्याच्या वडीलांनी व भावाने शिंदे यांना घरी बोलवून दिले व येत्या आठ दिवसात उर्वरित रक्कम देवू असे सांगितले.
अखेर पोलिस ठाण्यात दिली तक्रार...
काही दिवसांनी शिंदे यांनी विशाल याला पैशांसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फोन बंद येत होता. त्याच्या वडीलांना संपर्क केल्यावर त्यांनी आम्ही पैसे देवू शकत नाही, तुम्हाला जे करायचे आहे. ते त्याच्या सोबत करा, असे म्हणाले. त्यानंतर शिंदे यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार ५ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा माल चोरून विक्री केल्याप्रकरणी कामगार विशाल पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.