चाळीसगावातील बेलगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचा बैठकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:39 PM2017-11-11T17:39:39+5:302017-11-11T17:46:56+5:30
कामगारांची पन्नास टक्के देणी मिळाल्याशिवाय बोलणी न करण्याचा व्यक्त केला निर्धार
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव: दि.१२ : बेलगंगा साखर कारखान्यात काम करणा-या ६०० पेक्षा अधिक कामगारांची एकुण ८० कोटींची थकीत देणी आहे. यातील ५० टक्के रक्कम कामगारांना मिळाल्याशिवाय कोणतीही बोलणी करणार नसल्याचा पवित्रा घेत रविवारी चित्रसेन पाटीला यांच्या अंबाजी ट्रेडींग कंपनीने आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजता बेलागंगा सहकारी साखर कारखाना एम्प्लॉईज युनियनने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ३०० पेक्षा अधिक कामगार उपस्थित होते. बेलगंगा कारखाना विकत घेणारे भूमीपुत्र नसून व्यापारी आहेत. प्रा.फंडाची ११ कोटीची रक्कम जळगाव जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपिठात भरली. त्याच्याशी अंबाजी ट्रेडींग कंपनीचा संबंध नाही. त्यामुळे त्यांनी याचे श्रेय घेऊन नये, असे युनियनचे अध्यक्ष बापूराव शामराव पाटील यांनी मनोगतात सांगितले.
कामगारांच्या थकीत देण्यांपोटी रुपयाही न भरता कारखाना खरेदी करणारे कसे काय आमच्याशी बोलणी करु शकता? असा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर कामगारांनी रविवारी खरेदीदाºयांनी बोलविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
कामगारांचे ११० महिन्यांचे थकीत वेतन ५० कोटी, ग्रॅच्युुईटीचे २० कोटी आणि बोनससह रजेचा पगार याचे १० कोटी असे एकुण ८० कोटी रुपये थकीत आहे. यापैकी ५० टक्के रक्कम जोपर्यत कामगारांना मिळत नाही. तोपर्यंत कारखान्याचे कुलूपही उघडू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रा.फंडाची रक्कम देखील प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी. अशीही मागणी करण्यात आली. सचिव हिमंतराव देसले यांनीही मनोगत व्यक्त केले.