काम सोडलेल्या नोकरांनी केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:20 AM2019-02-08T11:20:03+5:302019-02-08T11:21:13+5:30
संशयित ‘सीसीटीव्ही’त कैद
जळगाव : नवीपेठेत बंद खोलीचे कुलूप तोडून हॉटेलच्या दोन कामगारांनीच हॉटेलच्या वापराचे दोन सिलेंडर व १५ हजाराची रोकड असा ३४ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. बुधवारी दुपारी २ वाजता ही चोरी झाली असून संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दोघांनी महिनाभरापूर्वीच काम सोडले आहे.
पंचमुखी हनुमान परिसरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी राकेश काशिनाथ माळी यांची जुन्या बसस्थानकात हॉटेल सरकार नावाने हॉटेल आहे. तसेच क्रीडा संकुल परिसरात बाबा चायनीज, लखन चायनीस या नावाने सायंकाळी गाड्या लावून व्यवसाय करतात.
चायनीजच्या गाडीवर ज्ञानेश्वर भास्कर कोळी व उत्तम पंडीत माळी हे कामाला असून ते नवीपेठेतील खोलीत राहतात.
बुधवारी दुपारी ३.३० वाजता ज्ञानेश्वर अंघोळीसाठी खोलीवर गेला असता त्याला खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने याबाबत मालक राकेश माळी यांना कळविले. त्यांनी पाहणी केली असता खोलीतील ४ हजाराचे दोन सिलेंडर, लोकेश माळी याचा चॉर्जिंगला लावलेला १५ हजाराचा मोबाईल व हॉटेलच्या धंद्याचे १५ हजाराची रोकड असलेली बॅग असा ऐवज लांबविलेला दिसला.
खांद्यावर नेले सिलिंडर
राकेश माळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दुपारी ३ वाजता खोलीतून सुरुवातीला एक जण खांद्यावर सिलेंडर घेवून जातांना तर त्यापाठोपाठ दुसरा संशयित त्याच्या पाठीला रोकड असलेली बॅग व खांद्यावर सिलेंडर घेवून जाताना दिसत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेले संशयित हे राकेश माळी यांच्या हॉटेलवर महिनाभरापूर्वी कामाला होते. अमर शांताराम बारुट रा. शिवाजीनगर, मुकेश रमेश राजपूत रा. नाथवाडा, कंजरवाडा अशी त्यांची नावे आहेत. दारुचे व्यसन असल्याने दोघांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली. याबाबळ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.