जळगावला कॉग्रेसच्या निषेध मोर्चात कार्यकर्त्यांची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:37 PM2018-05-27T12:37:32+5:302018-05-27T12:37:32+5:30
विश्वासघात दिन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - मोदी सरकार विरोधात कॉग्रेसतर्फे शनिवारी निषेध मोर्चा काढण्यत आला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० ते ५५ इतकी संख्या होती. त्यातही काही पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाले. मोर्चात कार्यकर्ते कमी असल्याने मोर्चाचा प्रभाव दिसून आला नाही.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्याने जल्लोष केला जात असताना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवार २६ रोजी विश्वासघात दिन पाळण्यात आला. यानिमित्त शिवतीर्थ मैदानापासून काढण्यात आलेल्या मुकमोर्चात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गैरव्यवहाराचे फलक झळकवित लक्ष्य वेधण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी आमदार अॅड.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानापासून दुपारी ३.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोदी सरकारचा निषेध म्हणून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाताला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविला. वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, गैरव्यवहाराचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.
हा मोर्चा स्टेट बँक चौकातून, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला.
मोर्चात अॅड.ललिता पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जि.प.चे आरोग्य सभापती दिलीप पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, जिल्हा युवक अध्यक्ष पराग पाटील, सरचिटणीस कफील शेख, रतिलाल चौधरी, सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष संजय वराडे, धनंजय पाटील, अजमल शाह अब्दुल शाह, हारून शाह, कमलाकर पाटील, जाकीर बागवान, हितेश पाटील, पांडूरंग पाटील, नीलेश पाटील, प्रमोद पाटील,प्रदीप नेहेते, विष्णु घोडेस्वार यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काही पदाधिकारीही अनुपस्थित
मोर्चा दरम्यान प्रदेश पदाधिकारी व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी सभापती प्रदीप पवार हे अनुपस्थित होते.
नेत्यांचा निषेध आणि कार्यकर्त्यांची सेल्फी
निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील व पदाधिकाºयांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. या दरम्यान उर्वरित कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत सेल्फी काढत हौस फेडली. तर काही कार्यकर्ते आल्या पावली माघारी परतल्याचे दिसून आले.
भर दुपारी निघाला निषेध मोर्चा
जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होता यावे यासाठी काँग्रेसतर्फे भर दुपारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी ४ वाजेपर्यंत अवघे ५० ते ५५ महिला व पुरुष कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. भर दुपारी पायी चालत यावे लागल्याने मोर्चात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते घामाघूम झाले.
४जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आला असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी मोर्चाच्या आयोजनाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. केंद्रातील भाजपा सरकारला २६ रोजी चार वर्ष पूर्ण होत आहे. या काळात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कृषी मालाला हमी भाव नसल्याने शेतकरी चिंतीत आहे. पिकविमा व कर्जमाफीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. कष्टकरी, शेतकरी व व्यापाºयांचा या शासनाने विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले.