जळगावात रेमंड कंपनीत कामगारांचे दोन तास काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:32 PM2018-04-21T12:32:24+5:302018-04-21T12:32:24+5:30
आंदोलन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ - पगारवाढीच्या चर्चेदरम्यान वाद होऊन निलंबित करण्यात आलेल्या चार कर्मचा-यांना कामावर घेण्याच्या मागणीवरून शुक्रवारी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान कामगारांनी कामबंद ठेऊन दोन्ही शिफ्टमधील कामगार एकत्र आले होते.
कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीमध्ये पगारवाढीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी गुरुवारी महाव्यवस्थापक नारखेडे यांच्याशी कामगारांची चर्चा होणार होती. त्यासाठी कामगार आलेदेखील होते. या दरम्यान काही कारणावरून वाद झाले व चार कामगारांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ही बाब इतर कामगारांना समजल्यानंतर सकाळ व दुपारच्या शिफ्टचे कामगार दुपारी ३ वाजता कंपनीमध्ये एकत्र आले व काम बंद केले. निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घ्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. जो पर्यंत चारही कामगारांना कामावर घेत नाही, तोपर्यंत कंपनी सुरू होणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला. अखेरीस कामगारांना कामावर घेण्यात आले व पाच वाजता कामगारांनी काम सुरू केले. या दोन तासादरम्यान कामगारांनी कामबंद ठेवले होते.
दरम्यान, या संदर्भात महाव्यवस्थापक नारखेडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.