संघटनेसाठी काम न करणाऱ्यांचे तिकिट कापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:54 AM2019-03-25T10:54:03+5:302019-03-25T10:54:50+5:30
महानगरच्या बैठकीत व्यक्त झाली भावना
जळगाव : ‘ज्यांनी संघटनेसाठी काम केले नाही, त्यांचे तिकीट कापले’ अशी भावना रविवारी बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या झालेल्ळा बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत आमदार स्मिता वाघ यांना जळगाव मतदार संघातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांच्या उपस्थितीत ही पहिलीच सभा होती.
खासदार निष्क्रीय असल्याचा ठपका लागू देणार नाही-स्मिता वाघ
शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही होवू शकेल त्यासाठी नेहमी प्रयत्न करण्याची तयारी राहणार असून, तुमच्यावर आपला खासदार निष्क्रीय असल्याचा आरोप करण्याची कधीही वेळ येवू देणार नाही, अशी ग्वाही भाजपाच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांनी भाजपाच्या जळगाव महानगरच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाºया या निवडणुकीत पहिल्यादांच महिलेला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संधी देण्यात आली असून, हा सर्व महिलांचा सन्मान असल्याचे वाघ यांनी सांगितले.
बैठकीला महानगराध्यक्ष व शहराचे आमदार सुरेश भोळे, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांच्यासह नगरसेवक, मंडळप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
वाद-विवाद विसरून काम करा - सुरेश भोळे
आमदारांशी किंवा इतर नगरसेवकांशी जे काही वाद विवाद असतील ते विसरून आता महिनाभर पक्षासाठी काम करण्याचे आवाहन महानगरप्रमुख व आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत केले.
शिवसेनेशी आपली युती असून, शिवसेनेचे नगरसेवक व मनपा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना सोबत घेवून आपल्याला काम करण्याची गरज असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
म्हणून तिकीट कापले
पक्ष हा सर्वोच्च असतो, पक्षाचे काम करणे हे सर्व पदाधिकाºयांचे काम असून, ज्या खासदारांनी संघटनावाढीसाठी काम केले नाही. अशा खासदारांचे तिकीट यंदा कापण्यात आल्याचे मनपाचे उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यानंतर बैठकीत शांतता पसरली होती. त्यानंतर घुगे-पाटील यांना आपण काय बोलले हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला.
६१ पैकी ३४ नगरसेवक उपस्थित
दरम्यान, भाजपाच्या या बैठकीत मनपातील ६१ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवक उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांसह इतर नगरसेवक या बैठकीला उपस्थित नव्हते.