शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:04 PM2021-01-28T19:04:40+5:302021-01-28T19:04:58+5:30
जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान ...
जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे. शाळेतून सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा त्याचा अखंडित प्रवास सुरू असतो. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.
निवडणूक आयोगाचे महत्वाचे काम आहे. हे सर्वच मान्य करतात. त्याचे प्रशिक्षण घेणे, मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी, कर्मचारी म्हणून ड्युटी करणे हे काम सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्य म्हणून आवडीने करतात. परंतु, याव्यतिरिक्त अनेक कामाचे दडपण, अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे शिक्षकांवर आले आहे. इतरही कोणतेही कामे असो, ते शिक्षकांचे माथी मारले जाते. त्यात मतदार यादी सर्वेक्षण, शौचालय नोंदणी, विविध जनजागृती, आरोग्य तपासणी विभागाचे विविध कार्य, मतदान याद्या तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. यातून सुटका कधी असा शिक्षकांचा प्रश्न आहे.
गुरूजी शाळेत येतच नाही, असा होतो आरोप
शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर अशैक्षणिक काम जास्त करावे लागतात. या कामासाठी एक शिक्षक पूर्णपणे लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याची काम मागे पडतात. पर्यायाने शिक्षक शिकवतच नाही, शाळेतच येत नाही, असा विद्यार्थी अपप्रचार करतात. त्यामुळे पालकांचा शाळा व शिक्षकाप्रती पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यातच दोन शिक्षकी शाळा असली की, दुसर्या शिक्षकावरही ताण पडतो.
शासकीय योजनांचा भार
- शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.
- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.
- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.
गुणवत्तेवर होतो परिणाम...
शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात दिली जातात. याचा परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर होतो. अनेक शिक्षकांना मानसिक आजारासह इतर आजारही जडले आहेत. दोन शिक्षकी शाळांच्या शिक्षकांचे अधिक हाल हातात. त्यामुळे गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.
- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद
जिल्हा परिषदेच्या शाळा - १८२७
जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या - ७३७७
जि. प. शाळा विद्यार्थी संख्या - १८३९६९