छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास अपूर्ण - सुमंत टेकाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:39 AM2018-03-04T11:39:06+5:302018-03-04T11:39:06+5:30
जळगावात ‘शिवरायांची चाणक्य निती’वर व्याख्यान
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - आदीलशाही, सुलतानी तसेच अफगाणांचे भारतावर अनेक आक्रमणे झाली. यामुळे उत्तर भारताने ६५० वर्षे तर महाराष्ट्राने ३०० वर्षे गुलामगिरी, छळ सहन केले. अशा बिकट परिस्थितीत फाल्गुन वैद्य तृतीयेला शिवराय जन्माला आले आणि या राजाने वयाच्या १४व्या वर्षीच स्वराज्य हे एकच ध्येय उराशी बाळगले आणि देशातील स्थिती बदलून टाकली. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास हा पूर्ण होऊच शकत नाही, असे मत व्याख्याते सुमंत टेकाडे यांनी व्यक्त केले.
शनिवारी रोटरी क्लब आॅफ जळगावतर्फे ‘शिवरायांची चाणक्यनिती’ याविषयावर कांताई सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, रोटरीचे माजी अध्यक्ष अशोक जोशी, रोटरी जळगावचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, सचिव कॅप्टन मोहन कुलकर्णी, उन्मेश प्रकाशनच्या मेधा राजहंस उपस्थित होते.
मराठीत श्लोकबद्ध केलेल्या ‘चाणक्यनितीचे प्रकाशन
कुमूदाग्रज अशोक जोशी यांनी मराठीत श्लोकबद्ध केलेल्या ‘चाणक्यनिती’ या ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. डॉ. स्मिता पाटील यांनी गणेशवंदना सादर केली. प्रास्ताविक तुषार फिरके यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य राष्ट्राची दोन दैवत
छत्रपती शिवाजी महाराज आणि आर्य चाणक्य हे आपल्या राष्ट्राची दोन दैवते असून छत्रपतींनी सामान्यांच्या जनकल्याणासाठी शिवमुद्रा तर आर्य चाणक्य यांनी जीवनाच्या भाष्याविषयी नीती अर्थात तत्वज्ञान सांगितले असेही सुमंत टेकाडे यांनी सांगितले. शस्त्र व शास्त्र यांचा अभ्यास करुन महाराजांनी गडकिल्ले जिंकले. ते करताना त्यांची युद्ध नीती चाणक्य नितीशी साम्य असणारी आहे. शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नसून त्या काळातील परिस्थिती व त्यांचा पराक्रम पाहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
चाणक्य कृतीशील विचारवंत - अशोक जैन
अध्यक्षीय भाषणात अशोक जैन यांनी अर्थशास्त्रापासून राजकीय क्षेत्रातील घडामोडींच्या वेळेस आर्य चाणक्यांचा उल्लेख होतो. ते कृतीशील विचारवंत होते. त्यांच्या चिंतनातून आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडते. तेजस्वी वाणी असलेल्या अशोक जोशी यांनी संस्कृतमधून मराठीत ग्रंथ श्लोकबद्ध केला. त्यांच्या कुमुदाग्रज या टोपण नावामुळे तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांची आठवण येते असेही अशोक जैन म्हणाले.
दत्तात्रय कराळे, अशोक जोशी व मेधा राजहंस यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले तर नितीन विसपूते यांनी आभार मानले.