कृषी विज्ञान केंद्रातर्फे जागतिक दूध दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:42+5:302021-06-03T04:12:42+5:30
ममुराबाद : कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा सहकारी दूध उत्पादक ...
ममुराबाद : कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दूध दिन साजरा झाला. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाली.
जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आर.आर. पाटील, जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन अधिकारी डॉ.सी.एम. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील उपस्थित होते.
डॉ.पाटील यांनी उपस्थित पशुपालक यांना सोरटेड सीमेन(नर व मादी बछड्यांची निवड पद्धत) या तंत्राचा वापर करण्याबाबत सुचविले. यामुळे शेतकऱ्यांना केवळ मादी बछड्याची निर्मिती होऊन एकूण दूध उत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल. या तंत्राचा वापर करण्यासाठी ८०० ते ९०० रुपये खर्च येतो, परंतु शासकीय मदतीमुळे शेतकऱ्यांना केवळ ८१ रुपयामध्ये सुविधा मिळणार आहे. जनावरांमधील रोगाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने लसीकरण करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. कोरोनामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे, पण लवकरच दुधाची मागणी वाढणार आहे, असे लिमये यांनी सांगितले.
डॉ.सी.एम. पाटील यांनी संसर्गजन्य आजारामुळे २० टक्के दूध उत्पादन कमी होते. त्यासाठी जनावरांचे आरोग्य चांगले ठेवून उत्पादन वाढविता येईल, असे सांगितले. आर.आर. पाटील यांनी पशुपालक शेतकऱ्यांनी नोंदणीकृत संस्था स्थापन करून मूल्यवर्धित दुधाचे पदार्थ तयार करावेत, असे स्पष्ट केले. किरण मांडवडे यांनी कार्यक्रमांमध्ये स्वच्छ दूध उत्पादन याविषयी सादरीकरण केले. जागतिक दूध दिन हा पशुपालक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, दुधाविषयी ग्राहकांमध्ये देखील जागरूकता निर्माण व्हावी, असे कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.बाहेती यांनी सांगितले. ऑनलाइन पद्धतीने स्वच्छ दूध उत्पादन तंत्र या विषयीच्या डिजिटल पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
डॉ.श्यामकांत पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तराच्या सत्रांमध्ये शंकानिरसन केले. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध स्तरावरील विस्तार कार्यकर्ते, पशुपालक शेतकरी व ग्रामीण युवक या सर्वांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन डॉ.विशाल वैरागर यांनी केले, तर वैभव सूर्यवंशी यांनी आभार केले.